Ajit Pawar : अजित पवारांचा विमानात बसलेला शेवटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Ajit Pawar Died: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण अपघातात निधन झाले.

Ajit Pawar Died: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, प्रशासनावर जरब असलेला एक लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
धावपट्टीजवळ विमानाचा स्फोट –
अजित पवार प्रचाराच्या निमित्ताने मुंबईहून विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले. पेट घेतला आणि मोठा स्फोट झाला. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती डीजीसीएने (DGCA) दिली आहे.
पवार कुटुंब बारामतीत दाखल –
या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण पवार कुटुंब हादरून गेले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य तातडीने बारामतीत पोहोचले आहेत.
अजित पवार यांचे पार्थिव बारामतीतील अहिल्याबाई होळकर रुग्णालयात आणण्यात आले असून, रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जनसागर लोटला आहे. “अजित दादा परत या”, अशा घोषणा देत कार्यकर्ते शोक व्यक्त करत आहेत.
शेवटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल –
विमानात बसलेला अजित पवारांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पांढरा झब्बा-पायजमा, गुलाबी जॅकेट आणि डोळ्यांवर गॉगल अशा नेहमीच्या डॅशिंग अवतारात ते दिसत आहेत. त्यांच्या शेजारी त्यांचा अंगरक्षकही बसलेला असून, हा त्यांचा ‘शेवटचा फोटो’ असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा आजचाच फोटो आहे का? याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला: मुख्यमंत्री फडणवीस
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक झाले. ते म्हणाले, “माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांसह देशभरातील राजकीय नेत्यांसह सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर –
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.
हेही वाचा – Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर उपस्थित झालेले 5 प्रश्न






