Ajit Pawar: ‘हिंमत असेल तर समोर या…’; ‘जोडे मारो’ आंदोलनावरुन अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

Shivaji Maharaj statue collapse । Ajit Pawar – मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. त्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे रविवारी राज्यभर ‘जोडे मारो’ आंदोलन केले. मुंबईत झालेल्या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान, आता या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली यावेळी ते बारामतीत बोलत होते. अजित पवार म्हणाले, “या घटनेचे विनाकारण राजकारण करु नका. आता काहींनी जोडे मारो आंदोलन केले, आमच्या फोटोला जोडे मारलेत, अरे कसे जोडे मारतात. जर हिंमत असेल तर समोर या. मीही बघतो. हा कसला रडीचा डाव खेळताय”, असा हल्लाबोल अजित पवारांनी यावेळी केला.
महाराजांच्या नावाला साजेसं भव्य स्मारक पुन्हा उभारण्यात येईल….
ते पुढे म्हणाले की, “राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, जे घडायला नको हवं होतं. मी त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली. पण यात ज्या कोणाची चूक असेल, त्याला शोधून काढू. ज्याने बांधकाम केलं किंवा ज्याने स्ट्रक्चरल ऑडिट देणारा जो कुणी चुकीचा असेल त्याला शोधायचं आणि शिक्षा करायची. त्यानंतर परत महाराजांच्या नावाला साजेसं भव्य स्मारक पुन्हा उभारण्यात येईल”, असे अजित पवार म्हणाले.
या माफीवीरांना घरचा रस्ता दाखवा !
शरद पवार तब्येत बरी नसतानाही या आंदोलनात सहभागी झाले होते. वयाचे बंधन न ठेवता महाराजांच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी शाहू महाराज आणि शरद पवार आले आहेत. मोदींनी माफी मागितली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली तरी आम्ही राजकारण करत असल्याचं सांगितलं जात आहे.
ज्या दिवशी महाराजांचा अपमान झाला, तेव्हाच राज्यातील जनतेने शिवाजी महाराजांची माफी मागितल. आम्ही शिवद्रोही सरकार चुकून निवडून दिलं, खोके सरकार निवडून दिलं याची माफी जनतेने मागितली आहे. आम्ही पुन्हा हे सरकार राज्यात येऊ देणार नाही अशी शपथ जनतेने घेतली आहे.
जे माफीवीर लोकं आहेत, मोदी असो की शिंदे असो हे केवळ निवडणुकीसाठी माफी मागत आहेत. या माफीवीरांना घरचा रस्ता दाखवायचा आहे. हा फुले शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र घडवायचा आहे. आपल्याला या शिवद्रोही सरकारला चलेजावचा नारा देणार आहोत.





