“अजित पवार, भुजबळ हे महादेव ॲपचे मेंबर”; भुपेश बघेल यांचा उल्लेख करत राऊतांची टीका

Sanjay Raut : ‘महादेव’ बेटिंग अॅप प्रकरणावरून सध्या छत्तीसगडमधील राजकाणात खळबळ उडाली आहे. महादेव बेटिंग ऍपच्या प्रवर्तकांनी छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना 508 कोटी रूपये दिल्याची माहिती चौकशीतून पुढे आली, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला. यावरुन आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांवर टीका करत गंभीर आरोप केले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, “लालू प्रसाद यादव म्हणाले होते की मी भाजपमध्ये गेलो असतो तर आतापर्यंत मी राजा हरिश्चंद्राचा अवतार झालो असतो, सत्यवादी झालो असतो. परंतु, मी भाजपत गेलो नाही, मी त्यांच्यासमोर गुडघे टेकले नाहीत, म्हणून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कारवाई चालू आहे. महादेव अॅपचंही तसंच आहे.”
“महादेव ॲपमध्ये भूपेश बघेल अडकले आणि जर ते आता भाजपमध्ये गेले तर त्यांचा हर हर महादेव होईल. हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर आहेत. ज्यांना जेलमध्ये पाठवायचं होतं त्यांची आता पूजा केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पवार,भुजबळ आणि मुश्रीफांवर फुलं उधळताना दिसत आहे.”
…तर हे अनाड्यांचे सरकार – संजय राऊत
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन देखील संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “ग्रामपंचायत निवडणुकासंदर्भात घटनाबाह्य सरकार जे फटाके वाजवतेय ते फुसके आहेत. हे आकडे प्रत्येक जण आपापल्या बाजूने दाखवत आहे. आम्ही कसे जिंकलो आणि विरोधक कसे हरले हे दाखवत आहेत हा मूर्खपणा आहे. या निवडणुका पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत, हे जर घटनाबाह्य राज्यकर्त्यांना माहित नसेल तर हे अनाड्यांचे सरकार आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
“या लोकांनी पंचायती राज समजून घ्यायला हवे. पण हे अनाडी घोडे उधळलेले आहेत. जे राजकीय पक्ष विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घ्यायला घाबरतात, त्यांची हातभर फाटते, त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर दावा सांगावा हे हास्यास्पद आहे. जे सरकार, जे राजकीय पक्ष मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुका लावत नाहीत ते सांगतात आम्ही ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो.
“तुम्ही मुंबई महापालिका सह इतर 14 महापालिकांच्या निवडणुका व जिल्हा परिषद निवडणुका घ्या आणि मग सांगा कोण जिंकलं कोण हरलं? या महाराष्ट्रामध्ये अडाण्यांचे सरकार आहे यात राज्याची बदनामी होत आहे. ते काही आकडे सांगू दे त्यांना आकडा लावायची सवय आहे. 50 खोके 40 खोके ते आकड्यावरच जगतात. निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेले असताना तुम्ही रडीचा डाव खेळता. एक पक्ष आणि एकदाच निवडणूक अशी त्यांची घोषणा आहे, ” अशी टीका संजय राऊत यांनी केली.





