विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार ठरला; अजित पवारांनी केली घोषणा

सातारा : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात विधानसभेची लढत होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार याची उत्सुकता सगळ्यानांच लागून राहिली आहे. जागा वाटपाबाबत बैठकांचं सत्र सुरू आहे, लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.
यादरम्यान महायुतीचा पहिला उमेदवार ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरच राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. अजित पवार यांनी फलटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली आहे. फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहता आले नाही.
मात्र त्यांनी सभेतील नागरिकांसोबत फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी फलटण विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची पुन्हा एकदा उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. दीपक चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना मोठे उधाण आले आहे.





