Ajit Pawar – अजितदादांच्या निधनाने एक कणखर नेतृत्व हरपले असून महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना खटाव येथील शोकसभेत सर्वपक्षीय मान्यवरांनी व्यक्त करत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी येताच अनेकांना धक्का बसला. खटावमध्ये ग्रामस्थांनी त्याचे नित्यचे व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवत शोक व्यक्त केला. शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय समोर आयोजित केलेल्या शोकसभेत सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती लावली होती. यावेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त करताना खटावमधील अनेक महत्त्वाच्या विकास कामात अजितदादांचे मोलाचे सहकार्य व योगदान आहे. सर्वसामान्यांसाठी झटणारा प्रामाणिक नेता, राजकारणातील सर्वात शिस्तबद्ध, स्पष्ट वक्ता आणि कणखर नेता दादांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला होता. त्याला गमावण्याची वेळ काळाने आणली. अनेकांनी दादांचे अचानक जाणे महाराष्ट्राला हानिकारक ठरणार आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले. सर्वसामान्यांची नेतृत्व गमावल्याचे दुःख यावेळी व्यक्त झाले.याप्रसंगी अजितदादांनी सर्व कार्यकर्त्यांना दिलेला शेवटचा संदेश माईक वरून ऐकण्यात आला आणि उपस्थित महिला तसेच ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले.