Ajit Pawar : अजित पवारांचा जनसंवाद! तीन हजार तक्रारी सादर ; १२०० समस्यांचे निराकारण केल्याचा दावा

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार सध्या विधानसभा निहाय जनसंवाद कार्यक्रम घेत आहेत. बुधवारी चिंचवड विधानसभा मतदारसंघात जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. पिंपरी जनसंवादप्रमाणे चिंचवडमध्येही नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामध्ये सुमारे तीन हजार नागरिकांनी आपल्या समस्या उपमुख्यमंत्र्यांकडे लिखित स्वरुपात दिल्या.
त्यापैकी १२०० समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.या तक्रारी मुख्यत्वे समाजकल्याण, पाणीपुरवठा, महसूल, बांधकाम परवानग्या, पोलीस, घनकचरा व्यवस्थापन, सिटी सर्व्हे कार्यालय, वीज वितरण, आरोग्य, सहकारी संस्था आणि वाहतूक विभागाशी संबंधित होत्या. प्रत्येक विभागाकडे २०० हून अधिक अर्ज आले आहेत.
या आधीच्या जनसंवाद सत्रांत हडपसर ४०००, पिंपरी ४८००, खडकवासला ३६०० आणि चिंचवड ३००० मिळून एकूण १५ हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ६ हजार २०० तक्रारींवर तत्काळ तोडगा काढण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणे संबंधित विभागांच्या पाठपुराव्यात आहेत.
चिंचवड येथील जनसंवाद उपक्रमात नागरिक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर आले. कार्यक्रमात व्हॉट्सअॅप चॅटबॉट्स, हेल्पलाइन क्रमांक आणि डिजिटल किऑस्क यांसारख्या आधुनिक माध्यमांचा वापर करून अर्ज नोंदविणे, त्यांचे ट्रॅकिंग आणि विभागीय समन्वय सुलभ करण्यात आला.
सर्वच तक्रारी सोडविण्यावर भर..
आज प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची नोंद करण्यात आली आहे. मी स्वत: विभागीय कार्यालयात जाऊन पुणे विभागीय आयुक्त व महापालिका अधिकाऱ्यांशी संबंधित विषयांवर चर्चा करणार आहे. प्रत्येक विभागाशी संबंधित प्रतिनिधींना आवश्यक सूचना दिल्या जातील. काही ठिकाणी पीएमआरडीएकडे असलेल्या भूखंडांची बेकायदेशीर खरेदी-विक्री होत असल्याचे समोर येत आहे, जे फसवणुकीसमान आहे.
अशा जमिनी खरेदी करणे चुकीचे आहे. ते पुढे म्हणाले, सर्व अर्जांचा पाठपुरावा केला जाणार आहे. शंभर टक्के काम पूर्ण होईल असे सांगत नाही, पण शक्य तितके काम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समन्वयातून करून घेण्याचा प्रयत्न राहील. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील जनतेला माझा शब्द आहे.”
सकाळीच केली पाहणी..
बुधवारी सकाळी नऊ वाजता जनसंवाद कार्यक्रम सुरू होणार होता. परंतु उपमुख्यमंत्री त्या आधीच शहरात आले आणि कुंजीर चौक, पिंपळे सौदागर परिसरातील वाहतूक आणि रस्ते समस्यांचा सविस्तर आढावा घेतला. अतिक्रमण, अव्यवस्थित पार्किंग व महावितरण संबंधित तक्रारींबाबत तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.





