Ajit Pawar : अजित पवारांच्या पक्षाला नागालँडमध्ये धक्का ! सर्व 7 आमदारांचा सत्तारूढ एनडीपीपीमध्ये प्रवेश

कोहिमा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसला नागालँडमध्ये मोठा राजकीय धक्का बसला. त्या पक्षाच्या नागालँडमधील सर्व 7 आमदारांनी पक्षबदलाचे पाऊल उचलले. त्यांनी त्या राज्यातील सत्तारूढ नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत (एनडीपीपी) प्रवेश केला. नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो एनडीपीपीचे प्रमुख आहेत.
राष्ट्रवादी सोडून आलेल्या आमदारांमुळे एनडीपीपीचे संख्याबळ २५ वरून वाढून ३२ इतके झाले. त्यामुळे त्या पक्षाने आता विधानसभेत स्वबळावर बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ गाठले आहे. नागालँड विधानसभेचे एकूण संख्याबळ ६० आहे. त्या राज्यात फेब्रुवारी २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये एनडीपीपी-भाजप युतीने बाजी मारली.
भाजपने १२ जागा जिंकल्या. तर, ७ जागा जिंकून तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनण्याची किमया राष्ट्रवादीने केली. मात्र, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्या पक्षाच्या नागालँड शाखेने अजित पवार यांना साथ देणे पसंत केले. मात्र, आता प्रादेशिक समीकरणे विचारात घेऊन त्या पक्षाच्या आमदारांनी एनडीपीपीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नागालँडमध्ये अजित पवार पक्षाची राजकीय ताकद तूर्त तरी नगण्य बनली आहे.





