Ajit Pawar : शेतकरी कर्जमाफीवर अजित पवारांचे मोठे विधान ; म्हणाले, ३० जून २०२६ पर्यंत निर्णय लागू, पण..

प्रभात वत्तसेवा
भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा प्लांट नं. 1 चा 70 वा व प्लांट नं. 2 चा 9 वा ऊस गाळप हंगामाचा तसेच गव्हाण पूजनाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे, कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे, संचालक मंडळाचे सदस्य, तसेच आप्पासाहेब जगदाळे, संभाजी होळकर, पुरुषोत्तम जगताप, प्रशांत काटे, विश्वनाथ गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, छत्रपती साखर कारखाना हा आपल्या कुटुंबासारखा आहे. येथे जात, पात, पक्षपात असा कोणताही विचार नाही. सभासदांनी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी उत्तम शेती करावी. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे आणि संचालक मंडळ यांच्याद्वारे कारखान्याचे हित जोपासले जात आहे. आम्ही सर्वतोपरी मदत करू आणि कुठेही कमी पडू देणार नाही.
श्री छत्रपती कारखान्याची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी सभासदांनी ऊस इतरत्र न देता आपला ऊस, आपल्या छत्रपतीलाच द्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कारखान्याभोवतालच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी डीपीडीसी निधीतून 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हे रस्ते झाल्यानंतर परिसराचा चेहरामोहरा बदलेल. तसेच भवानीनगर, खडकी, पारवडी, निंबोडी या भागातील सिमेंट काँक्रिट रस्ते आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाशी जोडणीचे काम लवकर सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कारखान्याजवळील फुलमार्ग बाहेरून वळवण्याची योजना देखील हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सूचित केले.
शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी पुढाकार..
अजित पवार म्हणाले, शेतकर्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत लागू होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्या उपस्थितीत यावर चर्चा झाली. मात्र वारंवार कर्जमाफी न होता शेतकर्यांनी आर्थिक शिस्त लावावी आणि टिकाऊ शेती करावी.
“कारखान्याचे वजन काटे चोख व पारदर्शक आहेत – सोन्याचे वजन केले तरी फरक पडणार नाही. त्यामुळे सभासदांमध्ये ‘वजन चोख, पैसे रोख, छत्रपतीलाच ऊस द्या बिनदोक’ हा नारा झंकारत आहे. केवळ पाच महिन्यांत आम्ही कारखाना परिसरात स्वच्छता व नवचैतन्य निर्माण केले आहे. यंदा 12 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू.”
-पृथ्वीराज जाचक, अध्यक्ष





