Ajit Pawar: अजित पवारांनी ठोकला पुण्यात तळ; भाजपला रोखण्यासाठी आखली ‘ही’ गुप्त रणनिती

प्रभात वृत्तसेवा
पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून राज्यात महायुतीत एकत्र असलेल्या भाजप – राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पुण्यात आता भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार पुण्यात तळ ठोकून असून रविवारी दिवसभरात शहरातील वेगवेगळया प्रभागातील कार्यकर्त्यांचा पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला.
त्याचबरोबर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येण्यासाठी भाजप विरोधी इतर पक्षांची मदत घेण्यासाठी थेट संपर्क साधत उमेदवारांना ताकद दिली आहे. ज्या ठिकाणी थेट भाजपच्या उमेदवारांशी सामना आहे, अशा ठिकाणी उमेदवारांच्या प्रचाराची सुरूवातही अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी महापालिकांमध्ये सत्तेचा अनुभव असल्याने अजित पवार यांनी २००७ च्या निवडणुकीत काँग्रेसला रोखण्यासाठी आखलेली रणनिती भाजपच्या विरोधात आखत आहेत.
त्यावेळी शहरातील खड्डे तसेच इतर विकासकामांवर जोरदार टीका करत राष्ट्रवादीने पुण्यात सत्तापालट केला होता. या निवडणुकीतही पवार यांनी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात सलग दोन दिवस घेतलेल्या पत्रकार परिषदेत महापालिकांच्या कारभारावरून थेट भाजपवर निशाना साधला आहे.
कार्यकर्त्यांचे प्रवेश
महापालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक इच्छुक भाजपमध्ये होते. महाविकास आघाडी झाल्याने काँग्रेस, मनसे तसेच शिवसेना ठाकरे गटातील अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे हे कार्यकर्ते नाराज आहेत. अशा स्थितीत या नाराज कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीन प्रवेश दिला जात आहे. रविवारी दिवसभर पुण्यात भोसलेनगर येथील अजित पवार यांच्या निवासस्थानी प्रवेशासाठी रांगा लागल्या होत्या.
उमेदवारांनी प्रभाग सोडू नये तसेच एकत्रित प्रचार करावा अशा सूचनाही यावेळी पक्ष प्रवेशासाठी कार्यकर्त्यांसोबत आलेल्या उमेदवारांना दिल्या आहेत. दिवसभर पवार यांच्याकडून स्वत: उमेदवारांशी संपर्क साधत राजकीय गणिते जुळविण्य़ासाठी उमेदवारांशी तसेच शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जात होती.





