Ajit Pawar : “अजित पवारांना पालकमंत्री पद मिळाले… पण त्यांना अधिकार नसणार’; शरद पवार गटातील ‘या’ नेत्याचा खोचक टोला

पुणे – मुख्यमंत्री शिंदे (CM Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर बुधवारी (दि. 4) राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे आता सोलापूर आणि अमरावती या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
याशिवाय राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर देखील नव्या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद दीपक केसरकर यांच्याकडून काढून घेत ते हसन मुश्रीफ यांना देण्यात आले आहे.
दरम्यान, पालकमंत्रीपदाच्या वाटपानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे (Tushar Kamthe) यांनी देखील अजित पवार यांना खोचक शब्दात टोला लगावला असल्याचं दिसून आलं आहे.
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे शहराचे पालकमंत्री पद मिळाले आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडून अजित पवार यांना पालकमंत्री पदाचे अधिकार दिले जाणार नाही’.
तसेच पुणे महापालिकेच्या सत्ताकाळात भाजपने केलेला भ्रष्टाचार अजित पवार बाहेर काढणार नाहीत. असा दावा देखील केला आहे. सध्या चंद्रकांत पाटील यांच्या जागी अजित पवार यांची वर्णी लागल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाची चिंता वाढणार असल्याचं देखील तुषार कामठे यावेळी म्हणाले.




