ajit pawar । आज बारामतीत अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार इमोशनल झालेले पाहायला मिळाले. या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलतांना ते म्हणाले,’मला परिवारात एकटे पाडण्यात आले आहे.’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. संसदेत भाषण करुन प्रश्न सुटत नाही. उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळला म्हणजे कामे झाली असे नाही, त्यासाठी तडफ असावी लागते, असा जोरदार टोला त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.
अवघ्या काही दिवसांत लोकसभेची निवडणूक जाहीर होईल. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन मार्च रोजी पाच जिल्ह्यांचा नमो रोजगार मेळावा होणार आहे. त्यासाठी आपल्या परिसरातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. आपल्या राष्ट्रवादीसोबत भाजप आणि शिवसेना आहे. आपली घड्याळ तेच आहे फक्त वेळ नवी आहे.
ते पुढे म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री पदासाठी हपापलेला नाहीय. मी पक्षही चोरलेला नाहीय असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनीबारामतीतील कार्यकर्त्यांना प्रचाराच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे सुतोवाचही केले आहे.