Ajit Pawar Action : काल काकांसोबत चर्चा अन् आज अजित पवारांकडून आव्हाडांचा गेम !

ठाणे : मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे एक तास चर्चा झाली, ज्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र, या भेटीच्या २४ तासांच्या आतच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक सुहास देसाई यांनी पक्षाला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून माजी नगरसेवकांच्या पक्षांतराचा सिलसिला कायम आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक अमित सरैया यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला होता. आता सुहास देसाई यांनीही अजित पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
विकासाच्या मुद्द्यावर पक्षप्रवेश: सुहास देसाई
ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या कार्यालयात आयोजित एका सोहळ्यात सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्याने दाखल झालेल्या देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी बोलताना सुहास देसाई म्हणाले, “विकासाच्या मुद्द्याला अनुसरून मी हा पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्याच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी मी यापुढे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे.”
ठाण्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम
सुहास देसाई यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. यावेळी अजित पवार यांनी पक्षातील नेत्यांना सूचना देताना म्हटले, “सुहास देसाई यांच्या प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट होईल. आनंद परांजपे आणि नजिब मुल्ला यांनी कोणताही भेदभाव न करता सर्वांना सामावून घ्यावे, याची काळजी घ्यावी.” देसाई यांच्या प्रवेशाने ठाण्यातील स्थानिक राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.





