अजित पवारांच्या निवासस्थानी राजकीय हालचाली ; शरद पवारांच्या ‘त्या’ दोन शिलेदारांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

Ajit Pawar । राज्यात सध्या सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे चर्चिले जात आहेत. यामध्ये बीड आणि परभणीच्या प्रकरणावरून सभागृहात विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसून येत आहे, दरम्यान, सभागृहात हे सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे शिलेदार चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या विजयगड बंगल्यावर राजकीय हालचाली होताना दिसून येत आहेत. शरद पवार पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद रोहित पाटील आणि अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रोहित पाटील अजित पवारांची भेट नेमकी कशासाठी ? Ajit Pawar ।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेच पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद रोहित पाटील यांनीदेखील अजित पवार यांची भेट घेतली आहे. ही केवळ विधानसभा मतदारसंघातील कामांच्या अनुषंगाने घेतलेली भेट असल्याचे रोहित पाटील यांनी म्हटले आहे.
पाटील-देशमुखांच्या भेटीने चर्चांना उधाण Ajit Pawar ।
तर रोहित पाटील यांच्यानंतर लगेच माजी मंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यात येत आहे. मात्र त्यांनी आपल्या भेटीविषयी बोलताना मतदारसंघातील कामांच्या अनुषंगाने भेटायला आलो असल्याचे सलील देशमुख यांनी एका वृत्तवहिनीला सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विभागला गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा एक होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच रोहित पाटील आणि सलील देशमुख यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीमागे काही राजकीय कारण नाही ना? अशी शंका राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे.
हेही वाचा
जयपूरमध्ये एलपीजी-सीएनजी ट्रकमध्ये भीषण अपघात ; 5 जणांचा होरपळून मृत्यू , अनेक वाहनांनाही आग





