धक्कादायक ! अज्ञाताने अजय बारस्कर महाराजांची कार जाळली

सोलापूर : कीर्तनकार अजय महाराज बारस्कर हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्याने मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. याच अजय बारस्कर महाराजांची कार जाळल्याची घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. आषाढी एकादशीनिमित्त १६ जुलैला पंढरपूरला गेले असताना ही घटना घडलीय. बारस्कर यांनी ६५ एकरच्या पार्किंगमध्ये कार लावून ते चंद्रभागा स्नान करण्यासाठी गेले होते. तिथून गर्दीमुळे ते पार्किंगला पोहोचू शकले नाही. दुसऱ्या दिवशी ते पोहोचले असता कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली.
तक्रार दाखल केली
अजय बारस्कर यांनी या प्रकरणी पंढरपूर पोलीसात तक्रार दाखल केली आहे. अजय बारस्कर यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. तेव्हापासून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावाही अजय बारस्कर यांनी केला होता. आता ही कार पेटवली असल्याचा संशय बारस्कर यांनी व्यक्त केला आहे.
अजय बारस्कर आषाढी वारीसाठी पंढरपुरात आले होते. 65 एकर परिसरात टोयाटो गाडी पार्किंग केली होती. ती गाडी जाळली आहे. परवा मध्यरात्री ते काल दुपारच्या दरम्यान गाडी अज्ञाताने जाळल्यचा प्रकार समोर आला आहे. भटुंबरे गावातील पंडीत शेंबडे यांच्या शेतात पार्क केलेली गाडी पेटवली. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.





