Anubhav Sinha on Ajay Devgn : सिनेसृष्टीमध्ये अनेकदा कलाकारांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळते. चित्रपटाच्या शूटिंग वेळी अथवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याने, अशा अनेक कारणांने कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्यामध्ये वाद झाले आहेत. असेच काहीसे अभिनेता अजय देवगण आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यामध्ये घडले आहे. मागील 18 वर्षांपासून दोघांनी एकमेकांसोबत संवाद साधलेला नाही. याबाबत स्वतः अनुभव सिन्हा यांनी खुलासा केला आहे.
एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुभव सिन्हा यांनी अजय देवगण मागील 18 वर्षांपासून त्यांच्याशी बोलत नसल्याचे सांगितले. तसेच, एक-दोनवेळा अजयशी संपर्क करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘रा.वन’, ‘मुल्क’, ‘थप्पड’, ‘भीड’ आणि ‘आयसी 814: द कंधार हाईजॅक’ यासारखे लोकप्रिय चित्रपट अनुभव सिन्हा यांनी दिले आहेत. 2007 ला त्यांनी अजय देवगणसोबत ‘कॅश’ हा चित्रपट केला होता. तेव्हापासूनच दोघांमध्ये अबोला आला आहे.
याबाबत बोलताना सिन्हा म्हणाले की, ‘आमच्यामध्ये कोणतेही भांडण झालेले नाही. तो माझ्याबरोबर का बोलत नाही, याचे कारण मला माहिती नाही. ‘कॅश’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर आम्ही एकदाही भेटलो नाही. मी स्वत: एक-दोन वेळा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कधीच एकही रिप्लाय केला नाही. आम्ही एकमेकांशी 18 वर्षे झाली बोललो नाही.’
दोघांमध्ये कोणते मतभेद झाले का? या प्रश्नावर ते बोलताना म्हणाले की,आमच्या दोघांमध्ये कधीही कोणते मतभेद नव्हते. निर्माता आणि फायनान्सर या दोघांमध्ये मतभेद होते. मात्र मी या दोघांपैकी एकही नव्हतो.
अजय माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. मला तो अभिनेता आणि व्यक्ती म्हणून आवडतो. त्यांच्यासोबत असणे मजेदार आहे. अजय तो व्यक्ती आहे जो मित्राला गरज असताना सर्वप्रथम उपस्थित असतो, असेही यावेळी बोलताना सिन्हा म्हणाले. दरम्यान, दोघांनीही ‘कॅश’नंतर आतापर्यंत कोणत्याही चित्रपटासाठी एकत्र काम केलेले नाही.