Tukaram Mundhe : अजय देवगणची हायकोर्टात धाव; तुकाराम मुंढेंचा थेट इशारा म्हणाले “FDA ची कारवाई…”
Tukaram Mundhe : FDA ची नोटीस मनमानी पद्धतीने बजावण्यात आल्याचा दावा अजय देवगणने याचिकेत केला आहे.

Tukaram Mundhe : पान मसाल्याच्या जाहिरातीवरून बॉलिवूडमधील कलाकारांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अभिनेता अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसला आव्हान देत अभिनेता अजय देवगण याने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. FDA ची नोटीस मनमानी पद्धतीने बजावण्यात आल्याचा दावा अजय देवगणने याचिकेत केला आहे.
या प्रकरणावर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजय देवगणने न्यायालयात याचिका दाखल केली असली, तरी FDA ची कायदेशीर कारवाई थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उलट ही कारवाई अधिक वेगाने पुढे नेण्यात येईल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, या प्रकरणात FDA कडून आधीच कारवाई सुरू करण्यात आली आहे. संबंधित तिन्ही कलाकारांना कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. या नोटिसांना उत्तर देताना तिघांनीही काही अतिरिक्त वेळ देण्याची मागणी केली होती.
मात्र, यापैकी अभिनेता अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने अद्याप FDA च्या कारवाईला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे याचिका प्रलंबित असली, तरी विभागाकडून नियमानुसार आणि निष्पक्षपणे पुढील दंडात्मक कारवाई सुरूच राहील, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
४ नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लक्ष
पान मसाल्याच्या जाहिरात प्रकरणात अजय देवगणने उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. FDA ची नोटीस आणि त्यावरील कायदेशीर आक्षेप यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे.
एकीकडे अजय देवगणने न्यायालयीन मार्ग स्वीकारला आहे, तर दुसरीकडे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाई सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत नेमके काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
CNAP : अनोळखी कॉल येताच आता स्क्रीनवर व्यक्तीचे नाव दिसणार; उद्यापासून सुरू होणार CNAP सेवा






