पुणे | आईसमान वहिनीला निवडणुकीत उतरवले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भाजपला बारामतीत येऊन विकास करायचा नाही, तर शरदचंद्र पवार यांना हरवायचे आहे. मात्र, भाजपला ते शक्य होत नसल्याने, त्यांनी आमचेच घर फोडून आमची आईसमान असलेल्या वहिनीला निवडणुकीत उतरवले, विचार करा ना? असे बोलत खासदार सुप्रिया सुळे निःशब्द झाल्या. या वेळी माझी लढाई ही कोणा व्यक्तीशी नसून, वैचारिक आहे. भाजप घेत असलेल्या चुकीच्या निर्णयाविरोधात आहे, असे स्पष्टीकरणही सुळे यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत सुनेत्रा पवार यांचीही उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सुळे (पवार) विरुद्ध पवार म्हणजे नणंद- भावजय अशी यंदाची लढाई पाहायला मिळणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता, माझी लढाई कोणा व्यक्तीशी नसून, वैचारिक आहे.
मोठ्या भावाची बायको म्हणजे वहिनी ही आपल्या आईसमान असते. भाजपला पवारांना हरवता येत नसल्यामुळे त्यांनी आमचेच घर फोडून आज आमच्या आईला निवडणुकीत उतरवले, असा शब्दांत सुळे यांनी भाजपचा समाचार घेतला. माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार झाले आहेत.
त्यामुळे माझे राजकारण व्यक्तीकेंद्रित नसून वैचारिक आणि विकासाचे असते. मी लीडसाठी नाही, तर सेवेसाठी निवडणुक लढवते. माझ्या प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे मुद्दे सातत्याने असतात, असेही त्यांनी सांगितले.
अब की बार गोळीबार सरकार
कोयता गँग आणि वाढत्या गुन्ह्यांबाबत सुळे यांना विचारले असता, राज्यात आज गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. ज्या ज्या वेळी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले, त्या- त्या वेळी राज्यात क्राईम वाढल्याची माहिती मी नाही, तर भाजपनेच दिली आहे. त्यामुळे ट्रिपल इंजिनचे सरकार हे अब की बार गोळीबार सरकार असल्याची टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.
देशात दडपशाही वाढली असून, कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, या दडपशाहीच्या विरोधात ताकदीने लढणार. बारामती लोकसभा मतदारसंघातील माझे काम, संपर्क पाहून लोक मलाच मतदान करून सेवेची पुन्हा संधी देतील.- सुप्रिया सुळे खासदार, बारामती लोकसभा मतदारसंघ





