शहरात सम-विषम तारखांची “ऐशीतैशी’

“सोशल डिस्टंन्सिंग’चे तीनतेरा : प्रभाग स्तरावरील अधिकारी गायब
पिंपळे गुरव – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने करोनाचा संसर्ग वाढू नये, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील दुकाने सम-विषम तारखांना खुली करण्याची परवानगी दिली, हे खरे असले तरी अनेक भागांमध्ये या नियमाची ऐशीतैशी होऊन सोशल डिस्टंन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील दुकाने सम-विषम तारखांना उघडण्याचा नियम तयार करण्यात आला. प्रशासनाच्या परवानगीशिवाय दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी प्रभाग स्थरावर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु ना अधिकारी दिसत ना दुकानदार नियम पाळत व नागरिकांना याचे देणे-घेणे नसल्यासारखे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे.
नागरिकांची गर्दी कमी व्हावी, म्हणून हा उपाय करण्यात आला होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीत शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा दुकाने बिनदिक्कतपणे सुरू आहेत. त्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे, त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी करण्यात आलेला नियम कागदावरच राहिला आहे. शहरातील नवी सांगवी, सांगवी, पिंपळे गुरव या परिसरातील अनेक भागांमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अनेक भागांत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी दुकाने सुरू असताना त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे तीन-तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. मास्कचा वापर न करणे, दुकानांमध्ये ग्राहकांमध्ये ठराविक अंतर न ठेवणे, असे प्रकार बऱ्याच भागांमध्ये होत असल्याचे पाहायला मिळाले. शहरात करोना वाढण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असताना सम-विषम तारखांचा नियम धाब्यावर बसवून अनेकांकडून दुकाने खुली करण्यात येत असली तरी त्याठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे करोनाच्या विषाणूंचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.





