Gujarat Airplane Crash : आमच्या चिमुकल्यांचे मृतदेह कुठेयत? रुग्णालय म्हणतंय, मिळणं कठीण; अली कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश

अहमदाबाद : एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलायनर (एआय-171) विमान अपघाताने मुंबईच्या गोरेगावातील जावेद अली कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. 12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनला जाताना झालेल्या या दुर्घटनेत जावेद अली, त्यांची पत्नी आणि दोन (2 आणि 4 वर्षे वयाच्या) मुलांचा मृत्यू झाला. 2७४ मृतांपैकी या कुटुंबाचा समावेश असून, अजूनही त्यांच्या मुलांच्या अवशेषांबाबत रुग्णालयाकडून ठोस माहिती मिळत नसल्याने कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.
अली कुटुंबीयांचा आक्रोश
अहमदाबादच्या कसोटी भवन येथे DNA टेस्टिंग प्रक्रियेदरम्यान जावेद अली यांच्या कुटुंबीयांनी संताप आणि हताशा व्यक्त केली. “आमच्या दोन आणि चार वर्षांच्या मुलांचे मृतदेह कुठे आहेत? दोन दिवसांपासून फेऱ्या मारतोय, पण रुग्णालय प्रशासन काहीच सांगत नाही. मुलं लहान होती, म्हणून अवशेष मिळणं कठीण आहे, असं सांगितलं जातंय. पण काहीतरी अवशेष हवेत, जेणेकरून आमच्या मनाला शांती मिळेल,” असे जावेद अली यांच्या मामीने सांगितले.
जावेद अली कुटुंबाची पार्श्वभूमी
जावेद अली गेल्या 12 वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. आईच्या तब्येतीसाठी ते कुटुंबासह मुंबईत सात दिवसांच्या सुट्टीवर आले होते. 12 जून रोजी लंडनला परतताना हा अपघात घडला. जावेद यांच्या आईच्या शस्त्रक्रियेनंतर ते कुटुंबासह परतत असताना या दुर्घटनेने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
रुग्णालयातील आव्हान
अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल येथे DNA सॅम्पलिंग सुरू असून, 250 हून अधिक नातेवाईकांच्या नमुन्यांचे संकलन झाले आहे. मात्र, अनेक मृतदेह जळून खाक झाल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे. विशेषतः लहान मुलांचे अवशेष शोधणे आव्हानात्मक असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
तपास आणि मदत
ब्लॅक बॉक्स आणि DVDR चे विश्लेषण सुरू असून, NIA, NSG, DGCA आणि गुजरात ATS तपास करत आहेत. टाटा ग्रुपने मृतांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपये नुकसानभरपाई आणि जखमींच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी घेतली आहे. दरम्यान, या दुर्घटनेने अली कुटुंबासह अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून, मृतदेहांच्या ओळखीची प्रतीक्षा कुटुंबीयांसाठी यातनादायी ठरत आहे.
महाराष्ट्रातील 16 जणांचा मृत्यू
या अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला, यात 241 प्रवासी आणि 24 स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 16 जणांचा यात मृत्यू झाला, ज्यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल, क्रू मेंबर्स दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती, इरफान शेख आणि प्रवासी मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार यांचा समावेश आहे.

