Flight Ticket: दिवाळीसाठी विमान प्रवास महागला, 25 टक्क्यांनी वाढले तिकीट

Flight Ticket Hike: आगामी सणासुदीच्या हंगामानिमित्त विमान प्रवास भाड्यात वाढ होत आहे. दिवाळीसाठी प्रमुख देशांतर्गत मार्गांवरील वन-वे तिकीट दर 10-15 टक्क्यांनी वाढले आहेत. दुसरीकडे, ओणम सणादरम्यान, केरळ शहरांमध्ये काही फ्लाइटचे भाडे 20-25 टक्के वाढवले आहे.
इक्सिगो या ट्रॅव्हल पोर्टलच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत दिल्ली-चेन्नई मार्गावरील थेट फ्लाइटसाठी इकॉनॉमी क्लासचे सरासरी वन-वे भाडे 25 टक्क्यांनी वाढून 7618 रुपये झाले आहे. हे भाडे गेल्या वर्षी 10-16 नोव्हेंबरच्या तुलनेत आहे. याच कालावधीत मुंबई-हैदराबाद मार्गावरील तिकीट दर 21 टक्क्यांनी वाढून 5,162 रुपये झाले आहेत. दिल्ली-गोवा आणि दिल्ली-अहमदाबाद मार्गावरील भाडे 19 टक्क्यांनी वाढून अनुक्रमे 5,999 रुपये आणि 4,930 रुपये झाले आहे.
भारतातील हवाई प्रवाशांची संख्या –
एका अहवालानुसार 2023 मध्ये जवळपास 15 कोटी प्रवाशांनी विमान प्रवास केला. रेटिंग एजन्सी इक्राचे म्हणणे आहे की आगामी काळात हवाई प्रवाशांची संख्या वाढत राहण्याची अपेक्षा आहे.





