अहमदाबाद : सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाची मोठी दुर्घटना घडली. लंडनला जाणाऱ्या या विमानाने टेकऑफ दरम्यान नियंत्रण गमावले आणि ते कोसळले. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 242 जण होते. आतापर्यंत या अपघातातील 210 जणांचे मृतदेह हाती आले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू एअर इंडियाच्या या विमानात असलेल्या 12 केबिन क्रू मेंबर्सपैकी 3 कर्मचारी महाराष्ट्राचे तर तीन जण प्रवासी असे एकूण 6 जण असल्याची माहिती समोर आली आहे. अपर्णा महाडिक, मैथिली पाटील आणि रोशनी राजेंद्र सोनघरे या तीन महिला या विमानात क्रू मेंबर्स म्हणून कार्यरत होत्या. तर महादेव पवार, आशा पवार आणि मयुर पाटील हे तीन जण या विमानात प्रवासी म्हणून प्रवास करत होते. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्या नातेवाईक आहेत. अपर्णा महाडिक या सुनिल तटकरे यांच्या सख्ख्या भाच्याच्या पत्नी आहेत. दुपारी अहमदाबादहून लंडनचं विमान असल्यामुळे अपर्णा महाडिक या आज सकाळीच अहमदाबादला गेल्या होत्या. अपर्णा यांचे पतीही एअर इंडियामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. विमानात कोणत्या देशाचे किती नागरिक? एअर इंडियाच्या या विमानात असलेल्या 230 प्रवाशांपैकी 169 प्रवासी हे भारतीय होते, तर 53 ब्रिटीश नागरिक, 7 पोर्तुगिज आणि 1 कॅनडाचा नागरिक होता. या विमानातून दोन लहान मुलंही प्रवास करत होते. कुठे झाला अपघात? दुपारी 1 वाजून 38 मिनिटांच्या सुमारास विमान अहमदाबादमधल्या रहिवासी भागात असलेल्या एका हॉस्पिटलवर जाऊन कोसळले, त्यामुळे रुग्णालयातील 10 ते 12 डॉक्टरही जखमी झाले आहेत. सरकारी रुग्णालयाच्या टीबी विभागावर हे विमान कोसळलं, तिकडे जेवणाची मेस होती.