मोठा अनर्थ टळला ! एअर इंडियाचे विमान अपघातातून थोडक्यात बचावले ; अनेक खासदार करत होते प्रवास

Air India Flight। तिरुवनंतपुरमहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात खराब हवामानामुळे संशयास्पद तांत्रिक बिघाड आढळल्याने ते चेन्नईला वळवावे लागले.त्यामुळे विमान अपघात होण्यापासून थोडक्यात वाचले आहे. एअरलाइन्सने या घटनेला दुजोरा दिला आहे. फ्लाइट क्रमांक A12455 चेन्नईमध्ये सुरक्षितपणे उतरले आहे आणि विमानाची आवश्यक तपासणी केली जाईल असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक खासदार देखील या विमानात प्रवास करत होते.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने घडलेल्या या अपघाताविषयी माहिती दिली. त्यांनीयाविषयी माहिती देताना ,”१० ऑगस्ट रोजी तिरुवनंतपुरमहून दिल्लीला जाणारे AI2455 चे विमान संशयास्पद तांत्रिक समस्या आणि खराब हवामानामुळे खबरदारी म्हणून चेन्नईला वळवले गेले आणि विमान चेन्नईत सुरक्षितपणे उतरले” असे सांगितले.
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी काय म्हटले? Air India Flight।
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, बाधित प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. चेन्नईमधील आमचे सहकारी प्रवाशांना त्यांची गैरसोय कमी करण्यासाठी मदत करत आहेत आणि प्रवाशांना शक्य तितक्या लवकर त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहेत. या विमानात अनेक खासदारही होते” असेही सांगितले.
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल यांनी सोमवारी आज सोशल मीडियावर एक पोस्ट करून याविषयी माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये,”त्रिवेंद्रमहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय २४५५, ज्यामध्ये मी, अनेक खासदार आणि शेकडो प्रवासी होते, आज भयानक दुर्घटनेच्या जवळ आले. उड्डाणानंतर काही वेळातच आम्हाला अभूतपूर्व अशांततेचा सामना करावा लागला” असे त्यांनी म्हटले आहे.
विमान २ तास हवेत फिरत राहिले Air India Flight।
वेणुगोपाल म्हणाले की, “सुमारे एक तासानंतर कॅप्टनने फ्लाइट सिग्नलमध्ये बिघाड झाल्याची घोषणा केली आणि विमान चेन्नईकडे वळवले. सुमारे दोन तास आम्ही विमानतळावर लँडिंगची परवानगी मिळण्याची वाट पाहत फिरत राहिलो. त्याच धावपट्टीवर आणखी एक विमान असल्याचे सांगण्यात आले. त्याच क्षणी कॅप्टनने ताबडतोब थांबण्याचा निर्णय घेतल्याने विमानातील सर्व लोकांचे प्राण वाचले. दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरले” असेही सांगितले आहे.
अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून जबाबदारी निश्चित करा
वेणुगोपाल यांनी या घडलेल्या प्रसंगाबद्दल माहिती देताना, आम्ही कौशल्य आणि नशिबाने वाचलो, परंतु प्रवाशांची सुरक्षा नशिबावर अवलंबून राहू शकत नाही. मी डीजीसीए आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला या घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आवाहन करतो, जबाबदारी निश्चित करावी आणि अशी चूक पुन्हा कधीही घडू नये याची खात्री करावी” असे आवाहन त्यांनी केले आहे.
विमानात कोणते खासदार होते?
एका वृत्तसंस्थेच्या मते, एअर इंडियाच्या या विमानात केरळचे खासदार आणि काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यासह यूडीएफचे संयोजक अदूर प्रकाश, काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. सुरेश, के. राधाकृष्णन आणि तामिळनाडूचे खासदार रॉबर्ट ब्रूस हे होते.





