एअर इंडियाच्या विमानात पुन्हा किळसवाणा प्रकार! एका प्रवाशाने दुसऱ्यावर व्यक्तीवर केली लघुशंका

Air India Urinate Case | एअर इंडियाच्या विमानातील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय 2336 या फ्लाइटमध्ये बिझनेस क्लासमधील एका प्रवाशावर दुसऱ्या पुरुष प्रवाशाने लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
एअर इंडियाच्या विमानात यापूर्वी देखील अशाप्रकारचा किळसवाणा प्रकार घडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. संबंधित पीडित प्रवासी एका खासगी कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी आहे. एअर इंडियाने देखील अशी घटना घडल्याची माहिती दिली आहे.
ही घटना विमान बँकॉक विमानतळावर उतरण्याच्या क्षणी घडली. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 9 एप्रिल रोजी एआय 2336 या फ्लाइटमध्ये क्रूला एका प्रवाशाच्या असंवेदनशील वर्तनाची माहिती मिळाली होती. नियमांनुसार संबंधित व्यक्तीवर तत्काळ कारवाई करण्यात आली व वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली आहे.
कंपनीने यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, क्रू सदस्यांनी पीडित प्रवाशाला बँकॉकमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यासाठी मदतीची तयारी दाखवली होती. मात्र, व्यक्तीने त्यावेळी तक्रार करण्यास नकार दिला.
या घटनेबाबत सखोल तपासासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे माहिती एअर इंडियाने दिली. तसेच संबंधित प्रवाशावर काय कारवाई करायची याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचेही कंपनीने नमूद केले. या प्रकरणात डीजीसीए (DGCA) च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल, अशी खात्रीही एअर इंडियाने दिली आहे.
दरम्यान, एअर इंडियाच्या विमानात प्रवाशांवर लघुशंका करण्याची ही पहिली घटना नाही. नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा नावाच्या प्रवाशाने एका महिला प्रवाशावर लघुशंका केली होती. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. संबंधित व्यक्तीला अटकही करण्यात आली होती, मात्र नंतर त्याला जामीन मिळाला होता.





