पिंपरी | गरजू विद्यार्थ्यांना मदतनिधी आणि शाळेला पुस्तके भेट
कान्हे, (वार्ताहर) – श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज कान्हे येथील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना ५० हजार रूपये मदतनिधीचे वाटप करण्यात आले.
अध्यापिका सविता चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून इयत्ता दहावी आणि बारावीत प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथील प्रदीप कुलकर्णी यांनी एकूण २० हजार रुपयांची रोख पारितोषिके देऊन गौरविले.
तर, दिनेश शेंबेकर आणि मंजुषा शेंबेकर यांच्या तर्फे शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना वार्षिक शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांची रोख स्वरूपातील मदत देण्यात आली. यासह लायन्स क्लब ऑफ पुणे रॉयल संस्थेच्या वतीने शाळेतील ग्रंथालयासाठी पाच हजार रुपये किंमतीची पुस्तके भेट देण्यात आली.
ग्रामीण भागातील अनेक हुशार विद्यार्थी आर्थिक अडचणींचा सामना करत शिक्षण घेत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात आर्थिक कारणामुळे खंड पडू नये यासाठी ही मदत करण्यात आली.
याप्रसंगी प्राचार्य कैलास पारधी यांनी लायन्स क्लब ऑफ पुणे रॉयल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्वाती जठार, सचिव महेंद्र शर्मा, कॅबिनेट ऑफिसर प्रदीप कुलकर्णी, खजिनदार दिनेश शेंबेकर, सदस्या मंजुषा शेंबेकर यांचे आभार मानले.





