Nandan Nilekani : AI मुळे मोठ्या कंपन्यांत नोकऱ्या कमी होणार? छोट्या व्यवसायांत रोजगाराच्या संधी – नंदन नीलेकणी
Nandan Nilekani : AI आणि ऑटोमेशनमुळे मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरकपात होऊ शकते, तर छोटे व्यवसाय आणि स्टार्टअप्स भविष्यात रोजगाराचे प्रमुख केंद्र ठरतील, असा दावा इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी केला. 2035 पर्यंत भारतात 10 लाख स्टार्टअप्स असतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

Nandan Nilekani : ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मुळे भारतातील मोठ्या कंपन्या काही वर्षांत ’निव्वळ नोकर्या गमावणार्या’ ठरतील आणि लाखो छोटे व्यवसाय भविष्यातील रोजगाराचे मुख्य इंजिन बनतील, असे इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी सांगितले.
एनसीएईआर इंडिया पॉलिसी फोरम मध्ये बोलताना, नीलेकणी यांनी भारत रोजगार निर्मितीकडे ज्या ’मानसिक मॉडेल’ने पाहतो, त्यात मूलभूत बदल करण्याची मागणी केली.
मोठ्या कंपन्यात नोकर्या सर्वात जास्त असुरक्षित असतील. कारण प्रत्येक नोकरी काही ठराविक कामांपुरती मर्यादित असते. हे काम स्वयंचलित करणे आणि नोकर्या कमी करणे सोपे आहे. त्यामुळे मोठ्या कंपन्या बहुधा निव्वळ नोकर्या गमावणार्या ठरतील. त्यांनी असा युक्तिवाद केला की भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्य तिच्या लाखो लहान व्यवसायांमध्ये आहे. जे एआयमुळे होणार्या व्यत्ययांना अधिक चीवटपणे तोंड देऊ शकतात. लहान कंपन्यात एआयचा वापर करणे गुंतागुंतीचे आहे. त्या अधिक नोकर्या निर्माण करतील.
त्यांनी असा अंदाज वर्तवला की भारत 2035 पर्यंत दहा लाख स्टार्टअप्सपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे, जी सध्या अस्तित्वात असलेल्या 1,50,000 स्टार्टअप्सच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे.
या स्थित्यंतराला पाठिंबा देण्यासाठी, नीलकानी यांनी मोठ्या प्रमाणावर नियमनमुक्ती करण्याच्या गरजेवर भर दिला. लहान उद्योजकांना नियमांच्या ओझ्यापासून वाचवले पाहिजे. आरबीआयच्या अकाउंट अॅग्रीगेटर आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्मसारख्या डिजिटल प्रणालींद्वारे त्यांना भांडवल आणि बाजारपेठांमध्ये सहज प्रवेश उपलब्ध करून दिला पाहिजे.
गिग इकॉनॉमी वाढणार –
नोकरीची निर्मिती कशी होईल याचा आपल्याला खरोखरच पुनर्विचार करावा लागेल, असे नीलेकणी म्हणाले. एखादा कामगार कंपनीत रुजू होऊन 40 वर्षे तिथेच राहतो ही पारंपरिक संकल्पना आता कालबाह्य होत आहे. वाढत्या प्रमाणात ’गिग इकॉनॉमी’मध्ये काम करणार्या आणि वारंवार नोकर्या बदलणार्या कर्मचारी वर्गाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी पोर्टेबल बेनिफिट्स (एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी सहज हस्तांतरित होणारे लाभ) आणि पोर्टेबल क्रेडेन्शियल्स (एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी सहज हस्तांतरित होणारी प्रमाणपत्रे) यांचे समर्थन केले.





