AI in Agriculture : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार? हवामानाचा अचूक अंदाज आणि हायटेक शेतीसाठी कॅनडासोबत करार
AI in Agriculture : कॅनडासोबतच्या सहकार्यामुळे कृषी अन्नप्रक्रिया आणि कौशल्य विकासाला मिळणार गती; मंत्रालयात सदिच्छा भेट संपन्न.

AI in Agriculture – महाराष्ट्रातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ती अधिक शाश्वत, स्पर्धात्मक आणि उत्पादनक्षम बनविणे हे राज्य सरकारचे प्रमुख ध्येय आहे. कॅनडासारख्या प्रगत देशासोबतचे सहकार्य कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञान, संशोधन आणि गुंतवणुकीसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. मंत्रालयात कॅनडातील उद्योग व संशोधन क्षेत्रातील प्रतिनिधीमंडळाने मंत्री भरणे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्र आणि कॅनडा दरम्यान कृषी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), कृषी अन्नप्रक्रिया, शिक्षण, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप्समधील सहकार्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. राज्यातील कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर सरकारचा विशेष भर असल्याचे सांगून मंत्री भरणे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानामुळे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणे, पीक व्यवस्थापन करणे आणि शेतकऱ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करणे अधिक प्रभावी होईल.
यामुळे उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होणार आहे. कृषी तंत्रज्ञान, संशोधन, अन्नप्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन तसेच पुरवठा साखळी व्यवस्थापन या क्षेत्रांत महाराष्ट्र आणि कॅनडा यांच्यात सहकार्य वाढल्यास राज्यातील शेतकऱ्यांसाठी नव्या आर्थिक संधी निर्माण होतील, असा विश्वास यावेळी मंत्री भरणे यांनी व्यक्त केला. तसेच दोन्ही देशांतील कृषी विद्यापीठांदरम्यान संशोधन सहकार्य, तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि विद्यार्थ्यांसाठी संयुक्त शैक्षणिक उपक्रम राबविण्याबाबतही सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.
या माध्यमातून कृषी क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळून युवा संशोधक आणि विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या बैठकीस कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, उपसचिव श्रीकांत हांडगे, अवर सचिव ललितकुमार धायगुडे तसेच पोखरा प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र शिक्षण व संशोधन परिषदचे सदस्य विनायक काशीद, इंडो कॅनडा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रशांत श्रीवास्तव, उपाध्यक्ष अलोक नागपाल, संदीप मामजीन, करम वीर राठी, विकास गुप्ता यांच्यासह कॅनडातील उद्योग व संशोधन क्षेत्रातील प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले.





