AI Transform Designers: एआयने बदलली डिझायनरची दुनिया; कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड
AI Transform Designers : एआयच्या मदतीने सर्जनशिलतेला नवी दिशा

पवनानगर – कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर आता दैनंदिन जीवनासोबतच फोटोग्राफी आणि ग्राफिक डिझाईन क्षेत्रातही मोठा बदल घडवून आणत आहे. काही सेकंदांत फोटो तयार करणे, फोटो एडिट करणे, पोस्टर-बॅनर तयार करणे, सोशल मीडिया क्रिएटिव्ह बनविणे आणि विविध प्रकारचे डिझाईन तयार करणे एआयमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पारंपरिक कामांवर परिणाम होत असून, व्यावसायिकांसमोर स्वतःला नव्या तंत्रज्ञानानुसार अपडेट करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
पूर्वी एखादे पोस्टर, लग्नपत्रिका, जाहिरात किंवा सोशल मीडिया क्रिएटिव्ह तयार करण्यासाठी ग्राहकांना डिझायनरकडे जावे लागत होते. त्यासाठी डिझाईनची संकल्पना, मांडणी, फोटो एडिटिंग आणि अंतिम डिझाईन तयार करण्यासाठी बराच वेळ लागत असे.
आता एआय आधारित विविध साधनांमुळे काही प्राथमिक स्वरूपाची कामे ग्राहक स्वतःच काही मिनिटांत करून घेत आहेत. याचा थेट परिणाम छोट्या आणि नियमित कामांवर होत असल्याचे क्षेत्रातील व्यावसायिक सांगतात.
अनुभवी ग्राफिक डिझायनर स्वप्निल भालेराव यांनी या बदलाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी आम्ही मोठा वेळ, पैसा आणि मेहनत घेतली. पूर्वी डिझाईनच्या कामासाठी ग्राहक स्वतःहून डिझायनरकडे येत होते. मात्र एआय तंत्रज्ञानामुळे डिझाईन क्षेत्रावर आणि विशेषतः डिझायनर्सच्या उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर डिझाईन क्षेत्रातील व्यावसायिक सुनील आढाव यांनी केवळ पारंपरिक डिझाईन कौशल्यावर अवलंबून राहणे भविष्यात पुरेसे ठरणार नसून एआय टूल्ससोबत सर्जनशीलता, ब्रँडिंग, लेआउट, टायपोग्राफी आणि ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
फोटोग्राफी क्षेत्रातील व्यावसायिक अंकुश दाभाडे यांच्या मते, एआयमुळे फोटो एडिटिंग आणि काही प्रमाणात क्रिएटिव्ह काम जलद आणि सोपे झाले आहे. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाचे छायाचित्रण, व्यक्तींचे भाव टिपणे, योग्य क्षणाची निवड आणि ग्राहकांच्या गरजेनुसार काम करण्यासाठी मानवी कौशल्याची आवश्यकता कायम असल्याचेही ते म्हणाले.
तसेच फोटोग्राफर अंकुश पडवळ यांनीही मोबाईल कॅमेरे आणि एआयमुळे फोटोग्राफी क्षेत्रातील साध्या कामांवर परिणाम झाला असल्याचे सांगितले. मात्र, एआयला स्पर्धक न मानता काम जलद आणि अधिक चांगले करण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. भविष्यात फोटोग्राफीमध्ये पारंपरिक कौशल्यासोबत एआय आणि क्रिएटिव्हिटीचा योग्य वापर करणाऱ्यांना अधिक संधी मिळण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
अपडेट राहणे हाच पर्याय
तंत्रज्ञानाचा वेग पाहता आज शिकलेले कौशल्य काही वर्षांनी पुरेसे राहीलच असे नाही. त्यामुळे फोटोग्राफर आणि डिझायनर्सनी सातत्याने नवीन साधने शिकणे आवश्यक आहे. एआयकडून काम करून घेण्यापेक्षा एआयच्या मदतीने स्वतःचे काम अधिक दर्जेदार कसे करता येईल, यावर भर देणे गरजेचे आहे.
फोटोग्राफरने फोटो एडिटिंग, कलर करेक्शन, एआय रिटचिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचे ज्ञान वाढवावे. तर डिझायनरने एआय टूल्ससोबत ब्रँडिंग, टायपोग्राफी, लेआउट, मार्केटिंग आणि ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याची क्षमता विकसित करणे गरजेचे आहे.
तंत्रज्ञानासोबत सर्जनशीलतेची जोड
एआय तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे फोटोग्राफी आणि ग्राफिक डिझाईन क्षेत्राचे स्वरूप बदलत आहे. काही कामे सोपी झाली आहेत. काही कामांसाठी लागणारा वेळ कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात एआय विरुद्ध माणूस अशी स्पर्धा करण्यापेक्षा एआय सोबत माणूस अशी कार्यपद्धती अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
मानवी सर्जनशीलता, अनुभव, भावनिक समज आणि ग्राहकांच्या गरजा ओळखण्याची क्षमता यांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास कामाची गुणवत्ता अधिक वाढू शकते. त्यामुळे एआय हे रोजगार संपवणारे साधन आहे की काम करण्याची पद्धत बदलणारे तंत्रज्ञान, याचे उत्तर व्यावसायिक ते तंत्रज्ञानाचा कसा वापर करतात यावर अवलंबून राहणार आहे.
Pune District : ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळ’ अजितदादांच्या दूरदृष्टीचे प्रतीक : सुनेत्रा पवार





