अहमदनगर – यात्रोत्सवाचे भाविकांना सवाद्य निमंत्रण!

पाथर्डी -शारदीय नवरात्र महोत्सव श्री क्षेत्र मोहटादेवी यात्रोत्सवाचे स्थानिक भाविकांना सवाद्य निमंत्रण देवस्थान समितीकडून देण्यात आल्याने भाविकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. देवस्थानच्या अनोख्या निमंत्रण पद्धतीमुळे स्थानिक भाविक यात्रा कमिटीच्या नियोजनाशी जोडले गेले असून, तालुक्यात येणाऱ्या पाहुण्या भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
रविवार (दि. 15) ते शनिवार (दि. 28)दरम्यान श्रीक्षेत्र देवी गडावर शारदीय नवरात्रोत्सव धूमधडाक्यात साजरा होत आहे. उत्सव काळात कीर्तन, भजन यांसह भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यावर्षी लाखो भाविक दर्शनासाठी गडावर उपस्थित राहतील या अंदाजाने भाविकांना सेवा सुविधा मिळतील असे नियोजन करण्यात आले आहे. देवस्थान समिती व प्रशासन नियोजनात व्यस्त आहे.
तालुक्यातील स्थानिक भाविक गडाशी जोडला जावा, नवरात्रोत्सव त्यांना आपलासा वाटावा हा उद्देश ठेवून देवस्थान समितीने मोहटा गावात प्रत्येक घरोघरी बॅंड वाजवत नवरात्रोत्सवाची निमंत्रण पत्रिका देण्यात आली. बुधवारी आठवडे बाजारात बॅंड पथकाबरोबर देवस्थानचे कर्मचारी तालुक्यातून आलेल्या भाविकांना निमंत्रण पत्रिका देत होते. देवस्थानकडून प्रथमच असा उपक्रम राबवण्यात आला आहे. पत्रिका हातात पडताच अनेकांनी निमंत्रण पत्रिकेचे दर्शन घेतल्याचे दिसले. पाथर्डी शहरात उपनगरातही वाजत-गाजत निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या.
जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळ व प्रशासनाकडून शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे नियोजनावर लक्ष ठेवून आहेत.





