अहमदनगर | धार्मिक सप्ताहातून तरुणांवर घडतात संस्कार

नेवासा |गोंडेगावमध्ये सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन धार्मिक सप्ताह एकोप्याने साजरे करतात, याचा मनस्वी आनंद आहे. सप्ताह व पारायण सोहळ्यातून धार्मिकता जपली जाते, यातून तरुणांवर दिशादर्शक संस्कार केले जातात. तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्याचे प्रबोधन सप्ताहातून केले जाते.
धार्मिक कार्यक्रमातून समाज जागृती साधली जाते, असे प्रतिपादन आ. शंकरराव गडाख यांनी केले. गोंडेगाव (ता.नेवासा) येथील सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याप्रसंगी आमदार शंकरराव गडाख यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थित भाविकांशी संवाद साधला. याप्रसंगी हभप रोहिदास महाराज सुसे म्हणाले, आ. गडाख नेहमी धार्मिक कार्याला पाठबळ देण्याचे काम करतात. तालुक्यातील गावागावांत मोठी धार्मिक परंपरा जपण्याचे काम सुरू आहे. गोंडेगाव परिसरासाठी आवर्तनातून पाणी उपलब्ध करून पाणी टंचाई दूर केल्याबद्दल आ. गडाख यांचे आभार मानण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती रावसाहेब कांगुणे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. संतोष फुलारी, सरपंच गोंडेगाव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी चेअरमन व भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





