अहमदनगर – लोकसभा लढविण्यास तयारच

पाथर्डी – लोकसभेच्या उमेदवारीसाठी मी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली असून मी माझ्या इच्छेवर ठाम आहे.2014 ला पक्षाने तिकीट दिले नाही.2019 ला मी घेतले नाही. आता 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी तयार आहे. यावर पक्ष आणि नेतृत्वाने निर्णय घ्यायचा आहे. शिंदे यांच्या या वक्तव्याने खासदार डॉ. सुजय विखे यांच्या राजकीय अडचणीत वाढ झाली असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अजून एक प्रतिस्पर्धी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे शिंदे यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे
आ. राम शिंदे हे सपत्नीक श्रीक्षेत्र मोहटादेवी चरणी नतमस्तक होण्यासाठी आले होते. विशेष म्हणजे त्यांचे वाहन राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके चालवत होते. त्यावरूनच आमदार शिंदे यांचे लोकसभेच्या रथाचे सारथ्य आ. लंके यांनी स्वीकारल्याने या राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या दोन्ही आमदारांना सोबत पाहताच तेथे उपस्थित असणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या.
मोहटा देवी गडावर आमदार राम शिंदे यांनी पत्नी आशा शिंदेसह देवीची पूजा व आरती केली. यावेळी आमदार नीलेश लंके, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, डॉ. मृत्यूंजय गर्जे, अर्जुन धायतडक आदी उपस्थित होते. शिंदे व लंके यांचा सन्मान व स्वागत देवस्थान समितीचे विश्वस्त शशिकांत दहिफळे, डॉ. श्रीधर देशमुख, अक्षय गोसावी, विठ्ठल कुटे, अनुराधा केदार, डॉ.ज्योती देशमुख, पोपट फुंदे, मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, भीमराव खाडे यांनी केले.
आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेली युवा संघर्ष यात्रावर बोलताना राम शिंदे म्हणाले, ज्या घराण्याने 50 ते 60 वर्ष या राज्यातील सत्ता उपभोगली. त्यांनी परत 60 वर्षांनंतर युवा संघर्ष यात्रा काढावी लागली, ही दयनीय बाब आहे. जनता आता त्यांना ओळखून आहे. हातात सत्ता असताना काही करायचं नाही आणि दुसऱ्यांनी केलं नाही. त्यावेळी बोंबा मारण्याचे काम करायचं. कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधींनी शंभर, दीडशे पीए ठेवले, एकही कर्जत-जामखेडचा ठेवला नाही. ज्या जनतेने तुम्हाला विधानसभेत पाठवले त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का? इथे युवा संघर्ष दिसला नाही का? असा सवाल केला.
आमदार लंके म्हणाले, आमदार शिंदे हे पालकमंत्री असताना मला त्यांनी राजकीय जीवनात पक्षाचा विचार न करता फार मदत केली. त्यांच्याविषयी माझ्या मनात वेगळी आस्था आहे. त्यामुळे मी त्यांची गाडी चालवायला बसलो, याचा मला आनंद आहे. मागच्या कालखंडात आम्ही वेगवेगळ्या पक्षाच्या मत प्रवाहात होतो, तरी पण आम्ही पक्ष बंधने सांभाळून प्रेम जपले आहे. आता आम्ही महायुतीत आल्याने आम्ही एकत्र आलोय एवढेच या निमित्ताने संकेत आहे. कोणाला काय समजायचं तो ज्याचा त्याचा विषय आहे. देवीचे आम्हाला एकत्र बोलून आलं म्हणून आम्ही एकत्रित देवी दर्शनाला आलो, हा आमच्यासाठी भाग्याचा दिवस असल्याचाही शेवटी लंके म्हणाले.
नीलेश लंके टॉपचे आमदार
राज्यातील 288 आमदारांमध्ये पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचे आगळे वेगळे स्थान आहे. त्यांचे रूप करोना काळात सर्वांनी पाहिले आहे. अशा भयानक काळात अनेक लोक करोनाला घाबरून पळून जात होते. अशाही परिस्थितीत गोरगरीब जनतेला आधार देऊन खरी सेवा आमदार लंके यांनी केली. आजही तसेच सेवा लंके करतात. मतदार संघातील नवरात्रीत मोठया प्रमाणावर लक्झरी बसेसद्वारे गोरगरीब महिलांना मोफत देवीचे दर्शन घडवत आहे. म्हणून लंके यांच्या कार्याचे कौतुक केले जात असल्याचे सांगून आ. शिंदे यांनीही कौतुकाची संधी सोडली नाही.




