अहमदनगर : मुक्ताई जत्रामुळे बचतगटांच्या कौशल्य आणि कलागुणांना वाव

सुनीता गडाख
नेवासा – येथील नेवासाफाटा रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात चार दिवशीय आयोजित “मुक्ताई जत्रा” उत्सवाची खेळ पैठणीच्या कार्यक्रमाने उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. चार दिवशीय मुक्ताई जत्रात लाखोंची उलाढाल झाली.” मुक्ताई जत्रा” मुळे महिला बचतगटांच्या कौशल्य आणि कलागुणांना वाव मिळाला. त्यामुळे मुक्ताई जत्रा ही महिलांसाठी पर्वणीच ठरली असल्याचे प्रतिपादन महिला बचतगटाच्या मार्गदर्शक सुनीता गडाख यांनी केले.
चार दिवस चाललेल्या मुक्ताई जत्रा निमित्ताने विविध स्टॉलवर जाऊन महिलांनी आवश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. विविध खाद्य पदार्थांच्या दुकानामध्ये स्वादिष्ट व रुचकर पदार्थांचा आस्वाद ही घेतला. मुक्ताई जत्रा उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते. मुक्ताई जत्राच्या प्रेरक व मुक्ताई महिला मंचच्या मार्गदर्शक शर्मिला शिंदे यांना या उपक्रमासाठी मुक्ताई महिला मंचच्या सदस्या कावेरी मापारी, जयश्री शिंदे,अर्चना कुंभकर्ण, मनिषा पोतदार यांनी उत्कृष्ट साथ दिली.
मुक्ताई जत्रेमध्ये लघु उद्योजक महिलांनी सक्रीय सहभाग नोंदवत आपला स्टॉल लावून व्यवसाय केला आणि त्यातून लाखोंची उलाढाल केली. नेवासा येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. गडाख यांनी सर्व आयोजक महिलांचे कौतुक समारोपप्रसंगी केले. नेवासा तालुक्यातील महिला बचतगट व उद्योजक व्यावसायिक यांना ६० स्टॉल उपलब्ध करून दिले गेले होते. पुढील वर्षी यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात मुक्ताई जत्रा उत्सवाला गती देऊ, असा निर्धार शर्मिला शिंदे यांनी व्यक्त केला. मुक्ताई जत्राच्या निमित्ताने आयोजित दिल है हिंदुस्तानी कार्यक्रमात कलाकारांनी देशभक्तीपर गीते गाऊन मनामनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवली. होम मिनिस्टर कार्यक्रमाने उपस्थित महिला भगिनींना मंत्रमुग्ध केले. त्यामुळे मुक्ताई जत्रा उपक्रम उत्साह वाढविणारा ठरला.





