अहमदनगर – मराठा आरक्षण; अनेक गावात पुढाऱ्यांना “नो एंट्री’!

नगर – मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गावोगावी सरकार व विविध राजकीय नेत्यांच्या विरोधात रोष तयार होऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक गावांनी खासदार, आमदारांसह नेत्यांना गावात प्रवेश बंदी असलेले जाहीर फलक लावून त्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. गावच्या प्रवेशद्वारातच राजकीय नेत्यांना “नो एन्ट्री’ चे फलक लागले आहेत.
आरक्षणासाठी राज्य भर जरांगे यांनी जाहीर सभांच्या माध्यमातून रान पेटवले. याच पार्श्वभूमीवर गावागावांतील मराठा समाज जरांगे यांच्या पाठीशी एकवटला आहे. आरक्षणाबाबत सरकार ची चाललेली चालढकल व राजकीय नेत्यांनी धारण केलेले मौन यामुळे समाजामध्ये अस्वस्थता, वाढत असून त्यांच्याबद्दल रोष व्यक्त होऊ लागला आहे.
नगर तालुक्यातील पोखर्डी, मांडवे, भातोडी पारगाव, जेऊर, इमापूर, वाळकी राळेगण म्हसोबा, मदडगाव, टाकळी काझी, पिंपळगाव उज्जनी, पारेवाडी, वाकोडी, सांडवे, दशमी गव्हाण या गावाने सर्व आजी, माजी खासदार, आमदारांसह राजकीय नेत्यांना गावात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही, असा इशारा देणारे फलक गावाच्या प्रवेशद्वारावच लावला आहे. त्याखाली कोणत्याही गावातील कार्यकर्त्यांच्या नावाचा उल्लेख न करता सकल मराठा व ग्रामस्थ असा उल्लेख करण्यात आला आहे.
त्यातून तालुक्यातील अनेक गावांचा आरक्षणा संदर्भात राजकीय नेत्यांबद्दलचा रोष व्यक्त होऊ लागला आहे. पोखर्डी येथील माजी सरपंच रामेश्वर निमसे यांनी दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. तर तालुक्यातील मांजरसुंबा येथील ग्रामस्थांनी विषेश ग्रामसभा आयोजित करून मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दर्शविला आहे. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत साखळी उपोषण करणार असल्याबाबतचा ठराव करण्यात आला आहे.
पिंपळगाव वाघात कॅन्डल मार्च
आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रत्येक गावात नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात येत असल्याचे फ्लेक्स लावले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा येथे ग्रामपंचायत ने व गावातील सर्व समाजाच्या वतीने ठराव घेऊन सर्व पक्षाच्या नेत्यांना गावबंदी केली.





