अहमदनगर – जनता दरबारातून सरकारवरील विश्वास दृढ

राहाता -जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य माणसांची कामे मार्गी लागावीत हाच प्रयत्न असतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा मी सुरू ठेवली आहे. असे जनता दरबार सर्वांनीच घेतले, तर शासन व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होईल आणि या माध्यमातून पारदर्शकताही समोर येण्यास मदत होत असल्याची भावना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
मंत्री विखे पाटील यांनी लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांचे अर्ज स्वीकारून त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. तसेच विविध संघटनांच्या शिष्टमंडळांशीही चर्चा करून, त्यांच्या प्रश्नांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
जनता दरबार ही विखे पाटील यांची संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सत्ता असो अथवा नसो नागरिकांच्या प्रश्नांसाठी महिन्यातून एक वेळा मंत्री विखे पाटील जनता दरबारचे आयोजन करून नागरिकांशी संवाद साधत असतात. सर्वच शासकीय विभागांचे अधिकारीही उपस्थित राहून, नागरिकांच्या प्रश्नांबाबत तातडीने निर्णय करतात. या जनता दरबारातील या संवादात्मक प्रक्रियेतून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठी मदत होते.
महसूलमंत्री झाल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी मागील वर्षभरात 10 जनता दरबार आयोजित केले. यापैकी नगर, राहाता, राहुरी या ठिकाणी 3 जनता दरबार झाले. या जनता दरबारच्या माध्यमातून वर्षभरात 17 हजार 304 अर्ज स्वीकारण्यात आले. यापैकी 9 हजार 276 अर्जांवर कार्यवाही होऊन त्यांची उत्तरेही वेगवेगळ्या शासकीय विभागाकडून नागरिकांना मिळाले आहेत. उर्वरित 8 हजार 28 अर्ज प्रक्रियेमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राप्त होणाऱ्या अर्जांवर जनसंपर्क कार्यालयातून सातत्याने पाठपुरावा होतो. संबंधित अर्जदाराला पत्रही दिले जाते. शासकीय कार्यालयांकडे पाठविलेल्या अर्जांवर झालेल्या कार्यवाहीचा पाठपुरावाही होत असल्याने नागरिकांची कामे मार्गी लावण्यात मोठी मदत होते. शासकीय कार्यालयांमधून प्रत्येक अर्जावर होणाऱ्या कार्यवाहीचा अहवालही दर महिन्याला आपण मागवत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.





