अहमदनगर | भंडारदरा पाणलोटात जोरदार पर्जन्यवृष्टी

राजूर | भंडारदरा परिसरात पावसाचा जोर वाढल्याने उत्तर नगर जिल्हाची जीवनदायनी असलेले भंडारदरा धरण काठोकाठ भरले आहे. धरणात 11 हजार 39 दशलक्ष घनफुट पाणीसाठा आहे. धरणातून आज 3 वाजता 23 हजार 806 क्यूसेस पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आल्याची माहिती भंडारदरा धरणाचे शाखाधिकारी अभिजित देशमुख यांनी दिली.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून घाटघर, रतनवाडी, पांजरे उडदावणे, साम्रद परिसरात श्रावण सरी जोरदार कोसळत आहेत. शनिवारी सकाळी भंडारदरा धरणात ११ हजार 39 दशलक्ष घनफुटावर पाणी साठा झाल्यावर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले. नवीन पाण्याची आवक जास्त वाढत असल्याने धरण साठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातील पाणी सोडण्यात आल्याचे शाखा अभियंता देशमुख यांनी सांगितले.
धरणातून पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदी दुधडी भरुन वाहत असल्याने रंधा धबधब्याने आक्राळ -विक्राळ रुद्र रुप धारण केले आहे. रंधा धबधबापासून पुढे मोठ्या प्रमाणात निळंवडे धरणाच्या जलाशयात नवीन पाण्याची झपाट्याने वाढ होत होत असून, निळवंडे धरणे पूर्ण क्षमतेने आज भरण्याची शक्यता आहे. निळवंडे धरणातून दुपारी 3 वाजता 21 हजार 700 क्यूसेसने विसर्ग प्रवरा नदी सोडला असून, नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.





