अहमदनगर – निवडणुकीच्या काळातही दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट

पाथर्डी – तालुका खरेदी- विक्री संघाच्या निवडणुकीत आज चार अर्ज दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक नेहमीप्रमाणे दुपारनंतर नगर येथे आपल्या घरी गेल्यामुळे अर्ज किती व कुणी भरले याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. कार्यालयात साहेबच नसल्याने दुपारनंतर कर्मचाऱ्यांचा शुकशुकाट होता. साहेब नाहीत म्हटल्यावर सहाय्यक निवडणूक अधिकारीही कार्यालयाबाहेर गेले. त्यामुळे निवडणुकी संदर्भात माहिती घेण्यासाठी आलेल्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. 22 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी शनिवार,रविवार ,नाताळ अशा सलग सुट्ट्या आल्याने निवडणूक प्रक्रिया थंडच होती. 29 डिसेंबर अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने 27, 28 व 29 असे तीनच दिवस दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.आज खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली.निवडणुकीविषयीची अधिक माहिती तसेच अर्ज घेण्यासाठी अनेक इच्छुकांनी सहाय्यक निबंधक सहकार संस्थांच्या कार्यालयात गर्दी केली होती.
त्यात बुधवार आठवडे बाजार असल्याने इतर रेगुलर कामासाठीच्या लोकांची वर्दळ होती. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उपलब्ध नव्हते. साहेब नगर येथे गेल्याचे कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. निवडणुकी संदर्भात तसेच इतर कामाची माहिती घेण्यासाठी आलेल्या लोकांना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक अधिकारी उपलब्ध न झाल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागला.
निवडणुकीची अर्ज भरण्याची मुदत तीन वाजेपर्यंत आहे. निवडणुकीचे अर्ज भरण्याबाबतची माहिती देण्याचे काम माझे नाही. कार्यालयात मुळातच कर्मचारी कमी आहेत. आता मी बस स्टँडवर आलो आहे. किती अर्ज भरले, याची माहिती मी उद्या सकाळी देऊ शकेल.
गोकुळ नागरे,
निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक,
सहकारी संस्था,पाथर्डी





