श्रीरामपू – जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही कारखान्याने ऊस दर जाहीर केलेला नाही. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे प्रतिनिधी व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात येऊन ऊसदराचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा जिल्ह्यातील शेतकरी उसाच्या तोडी बंद करतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसले यांनी दिला आहे. मागील हंगामात बहुतांश कारखान्यांनी कार्यक्षेत्राच्या बाहेरून आणलेल्या उसाला कमी दर दिलेला आहे. कारखानदारांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रादेशिक सहसंचालकांना भोसले यांनी याबाबत निवेदन दिले आहे. काही कारखान्यांनी हंगाम सुरू करण्यापूर्वी जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात इतरांच्या तुलनेत दर कमी दिला. केवळ शर्करांशनुसार दिली जाणारी एफआरपी पूर्ण केली असून उपपदार्थ अर्थात इथेनॉल, स्पिरीट,को-जनरेशन आदींचे पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले नाहीत, अशी फसवणूक करून कारखान्यांनी तोडीला सुरुवात केली आहे. पूर्वी साखर उताऱ्यानुसार विभागनिहाय दर ठरवण्यात येत होते. कोल्हापूर, सातारा,सांगलीपेक्षा २०० रुपये प्रति टन पुणे विभागाचा दर कमी होता.अहिल्यानगर जिल्हा हा पुणे विभागात येतो. मात्र, पुणे जिल्ह्यातील कारखाने ३७०० रुपये प्रति टन दर देत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखाने २७०० रुपये दर देत आहेत. प्रति टन एक हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे, असे भोसले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे प्रतिनिधी व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात यावी. ऊसदराचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा जिल्ह्यातील शेतकरी उसाच्या तोडी बंद करतील. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा भोसले यांनी दिला.