अहमदनगर – आ. थोरात यांच्या होम ग्राउंडवर बॅटसमन कोण?

अमोल मतकर
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये पालकमंत्री तथा महसूल मंत्री विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये नव्या बॅटस्मनची गरज असल्याचे सांगितले असून त्यासाठी आपण योग्य फिल्डिंगही लावणार असल्याचे स्प्षट केले. पण तालुक्यातील काँग्रेसचे पक्षाचे जेष्ठ नेते , आमदार बाळासाहेब थोरात यांच्या होम ग्राउंडवर त्यांच्या विरोधात कोण बॅटमॅन उभा करणार याबाबत संगमनेर तालुक्यातील जनतेला ही उत्कंठा लागली आहे. काहींचे नाव आता समोर येऊ लागले आहे. भाजप संगमनेरमध्ये काय करिष्मा करणार, कोणत्या बॅट्समनला रणांगणात उतरवणार हे येणाऱ्या आगामी काळातच समजेल.
संगमनेर तालुक्यातील शिवसेना (उबाठा) नेते जनार्दन आहेर यांचा बालेकिल्ल्यात झालेल्या कार्यक्रमात मंत्री विखे यांनी आहेर यांना योग्य निर्णय घेण्याचा सल्ला दिला. या अगोदरही आ. थोरात यांच्या विरोधात दंड थोपटले होते. मात्र, थोरात यांच्या स्पीचवर त्यांचा टिकाव लागला नाही. मात्र, साथ नसतानाही लढत रंगतदार झाली होती. त्यामुळे जनार्दन आहेर यांचे नाव पुढे येत असले तरी त्यांनी अजून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडले नसून त्यामुळे तालुक्यातील राजकारणाला वेगळीच फोडणी बसत आहे. त्यामुळे जनार्दन आहेर हे पुन्हा मैदानात उतरणार का? ते भारतीय जनता पक्षात जाणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
1990 साली हभप वसंतराव गुंजाळ यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे दुसरे नाव गुंजाळ यांचे येत असून थोरातांसमोर पुन्हा एकदा फलंदाजीसाठी उतरणार असल्याची चर्चा रंगत आहे. 1990 साली गुंजाळ यांना अवघ्या 5000 मतांवरून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी थोरात यांचे होम स्पीच जास्त सक्षम नव्हते. त्यांचे फिल्डरही सक्षम नव्हते. परंतु पुढच्या काळात त्यांनी आपल्या मतदारसंघात सहकार आणि सहकारातील वेगवेगळ्या संस्थांमार्फत आपली फील्डिंग मजबूत केली आहे. त्यामुळे आता थोरात यांना कडवी झुंज देणारे आणि अवघ्या ४८६२ मतांनी पराभूत झालेले भाजपाचे ज्येष्ठ नेते हभप वसंतराव गुंजाळ यांचे नाव समोर आल्याने येणाऱ्या आगामी काळात थोरात यांच्या होम ग्राउंडवर गुंजाळ यांचा निभाव लागणार का, हे येणारा आगामी काळच सांगेल.
नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल भाजपासाठी निर्णायक असल्याने विरलेली मोदी लाट पूर्ण उदयास आल्याचे चिन्ह दिसायला लागल्याने संगमनेर तालुक्यातील काही इच्छुकांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. दिवाळी उत्सवात तालुक्याचे भूमिपुत्र , बांधकाम विभागाचे अधिकारी राहिलेले राजेंद्र रहाणे यांनीही दंड थोपटल्याचे दिसून येते. यादरम्यान ग्रामीण भागातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुक्या मेव्याचे पाकिटे पोहोचून दिवाळीच्या शुभेच्छा देऊन एक प्रकारे आपले नाव प्रत्येक घरात पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू केली. राहणे यांचे नाव विधानसभेच्या उमेदवारासाठी चर्चेत आले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये फिल्डिंग लावणार असल्याचे ठामपणे सांगितले असले तरी आ. बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात कोणाचाही निभाव लागणे सध्या तरी शक्य वाटत नाही. भाजपाने कितीही साम- दाम- दंड-भेद चा वापर केला, तरी संगमनेर मतदारसंघात याचा काही परिणाम होईल, असे वाटत नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे लोकसभा निवडणुका झाल्यानंतर खरा बॅटमन कोण, हे त्यावेळेस स्पष्ट होईल.





