राहुरी : पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या या चोरांकडून अल्पदरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात, अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशनने आज विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली. मोहिमेदरम्यान 30 दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली. वाहनांवर 20,500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आजच्या कारवाईतील 30 दुचाकी वाहनांपैकी 24 वाहनांवर दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट बसवून वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आलेली आहेत.उर्वरित वाहनांची कागदपत्रे अद्यापपर्यंत नागरिकांनी हजर न केल्याने ती वाहने पोलीस स्टेशन येथे जमा आहेत. ही मोहीम पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, हनुमंत आव्हाड, संदीप ठाणगे, संजय राठोड, बबन राठोड, बापू फुलमाळी, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, सतीश कुराडे, जालिंदर धायगुडे यांच्या पथकाने केली आहे.