अहमदनगर : मालगाडीचे १२ डबे रुळावरून घसरले; दौंड-मनमाड रेल्वे वाहतूक ठप्प

समीरण नागवडे
श्रीगोंदा – दौंडकडून मनमाडकडे जाणाऱ्या मालगाडीचे १२ डबे रुळावरून घसरून मोठा अपघात झाला. ही घटना श्रीगोंदा रेल्वे स्थानकानजिक आज (दि.२३) पहाटे घडली. मालगाडी असल्याने सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु रेल्वेरुळाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, या रेल्वे मार्गावरील रेल्वेवाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिमेंटची वाहतूक करणारी एक मालगाडी बुधवारी रात्री दौंडकडून मनमाडच्या दिशेने चालली होती. या गाडीला ४२ डबे होते. ही गाडी मनमाडच्या दिशेने जात असताना पहाटे श्रीगोंदा रेल्वे स्थानक ओलांडून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर या रेल्वेचे डबे रुळावरून घसरले. या अपघातात या गाडीचे १२ डबे रुळावरून घसरले. मालगाडी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या अपघातात रेल्वे रुळाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली असून या मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या मागील स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वेरुळाच्या दुरुस्तीला मोठा अवधी लागण्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा व बेलवंडी पोलिसांनी रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक दिलीप तेजनकर व पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे यांनी अपघातस्थळी धाव घेतली.







