जामखेड : तालुक्यातील खर्डा जवळील भूम तालुक्याच्या हद्दीतील मातोश्री कै.लो. सू. तरंगे प्राथमिक आश्रम शाळा व कै.सु.म. तरंगे माध्यमिक आश्रमशाळा कनिष्ठ महाविद्यालय येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा शाळेजवळील विहिरीत मृतदेह आढळून आला. या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करा, या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी शनिवारी दुपारी जवळपास एक तास नळी वडगाव फाटा भूम-खर्डा मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनस्थळी पोलिसांनी भेट देऊन नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे यांनी सदरील घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत माहिती अशी की, नळी तालुका भूम जिल्हा धाराशिव येथे कै.लो.सू तरंगे माध्यमिक आश्रम शाळा आहे या ठिकाणी खर्डा येथील आशिष बाळू काळे इयत्ता नववी मध्ये शिकत होता तो दिनांक 3 ऑक्टोबरपासून शाळेतून संध्याकाळी सहा वाजलेपासून गायब होता. त्यानंतर शाळेतील सरांनी त्याच्या घरी फोन करून मुलगा घरी आला का अशी विचारणा केली त्यावेळी त्यांच्या घरच्यांनी आशिष हा घरी आला नसल्याचे सांगितले होते त्यानंतर दिनांक 4 ऑक्टोबर रोजी अधिक तपास केला असता शाळेच्या जवळ एक किलोमीटर अंतरावर संध्याकाळी सात वाजता त्याचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यावेळी त्याचे आई-वडील व नातेवाईक आक्रमक झाले पोलिसांनी सदरचा मृतदेह पंचनामा करून पोस्टमार्टम साठी जिल्हा धाराशिव येथे पाठविण्यात आला. त्यानंतर त्याचे आई-वडील व नातेवाईकांनी शाळेतील सर्व संस्थेच्या संचालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना त्याची आई म्हणाली की, माझ्या मुलाचा मृतदेह फुगून वर आला होता, त्याचे डोळे बाहेर पडले होते, जीब बाहेर आली होती, त्याच्या अंगावर कपडे त्याचे नव्हते. त्याच्या अंगावर चट्टे सुद्धा होते, गळ्याला वन होता, मान वाकडी झाली होती. त्यामुळे त्याचा खूनच झाला असल्याचे उपस्थित सर्व नागरिकांनी नातेवाईकांनी आरोप करून संस्थेचे संचालक व तेथील शिक्षकांवर खुणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. त्यानंतर नळी वडगाव फाट्यावर सर्व आदिवासी पारधी समाजाने रस्ता रोको आंदोलन सुरू केले. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्याचा मृत्यूस कारणीभूत असणारे खताळ ,देवकर , इटकुडेर, आदाळे , टेकाळे , कोळेकर, शेंडगे , शिंदे , श्रीरामे ,सद्दाम यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा लेखी अर्ज मुलाची आई शर्मिला बाळू काळे यांनी पोलिसांना दिली आहे. तसेच याचा तपास करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. मुलाचा मृत्यू हा अपघात नसून घात आहे असा आरोप केला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे बबलू सुरवसे, विशाल पवार, मधु पवार गौतम पवार रोहित काळे वसंत पवार अनिल काळे व बहुसंख्य आदिवासी पारधी समाजाचे कार्यकर्ते व नागरिक हे उपस्थित होते.