Nevasa News : बोगस कामगार नोंदणीविरुद्ध अहिल्यानगर मजदूर संघ आक्रमक; मागण्यांसाठी ढोल बाजाओ आंदोलन करणार

नेवासा : जेऊर हैबती (ता. नेवासा) येथे कामगार विभागातर्फे झालेल्या चौकशीनंतर आढळून आलेल्या बोगस कामगार व त्यांना नोंदीत करणाऱ्या एजंटच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी अहिल्यानगर मजदूर संघाने दिला आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाचे बनावट शिक्के वापरुन कामगार मंडळाकडे नोंदीत झालेले सुमारे ३ हजार ५०३ कामगारांपैकी ३ हजार १६४ बनावट कामगार शोधून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे करावे. तसेच त्यांनी घेतलेला लाभ पुन्हा मंडळाने परत करुन घेण्याचा सज्जड इशारा अहिल्यानगर मजदूर संघाने दिला आहे.
नेवासा तालुक्यात होणारी बोगस कामगारांची नोंदणी ही केवळ ठेकेदार, इंजिनियर आणि ग्रामपंचायतीचे बनावट शिक्के वापरुन केली जात असून ही नोंदणी थांबविण्याकरता तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. बनावट काम करणाऱ्या संबंधित एजंटना शोधून त्यांच्यावर आणि नोंदीत झालेल्या बनावट कामगारांवर तातडीने फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
सोमवार (दि. ३०) रोजी अहिल्यानगर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर समर्पण मजदूर संघ ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे न्याय मागणार असल्याची माहीती डॉ. करणसिंह घुले यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.
नेवासा तालुक्यात बांधकाम कामगार लाभ वाटपामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. शिष्यवृत्तीच्या लाभासाठी जानेवारीपासून समर्पण मजदूर संघाचे खरे बांधकाम कामगार अद्यापही लाभापासून वंचित आहेत. शिष्यवृत्ती वाटपाची प्रक्रिया पुर्णपणे पारदर्शक करण्यात यावी तसेच आतापर्यंत झालेल्या शिष्यवृत्ती वाटपाचा पुर्ण आढावा जागेवर बैठक घेऊन देण्यात यावा.
मागील प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने कामगारांच्या खात्यात वर्ग करावी या व अन्य मागणीसाठी सोमवार (दि. ३०) रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर समर्पण मजदूर संघाने ढोल बजाओ आंदोलन करणार आहे. यामध्ये नवीन नोंदणी झालेल्या अनेक कामगारांचे स्मार्ट कार्ड मंडळाने हस्तांतरित केलेले नाही, ही बाब बेकायदेशीर आहे. ठराविक ठेकेदारांना लाभ देण्यासाठी अशा पद्धतीची अवैध कार्यपद्धती विकसित करण्याचा सहाय्यक कामगार आयुक्तांना कोणताही अधिकार नसून, आपण याबाबतीत आपली कार्यपद्धती तातडीने सुधारून रोखून ठेवलेले स्मार्ट कार्ड कामगारांना तातडीने वितरित करावे.
नवीन नोंदणी झालेल्या कामगारांना भांडीवाटप, सुरक्षा संच वाटप तातडीने करावे. तसेच इतर लाभांच्या बाबतीतही तातडीने निर्णय घेण्यात यावा व बांधकाम कामगार एजंट असलेल्या लोकांना कामगार कार्यालयाकडून सहकार्य होत असल्याचे मजदूर संघाच्या निदर्शनास आलेले असून, याबाबत आपली कार्यपद्धती तातडीने सुधारुन घेण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
बांधकाम कामगारांना व्यक्तिगतरित्या मुख्य कार्यालयातूनच वितरण करण्यात यावे नाका कामगार पुस्तिकेद्वारे नोंदीत झालेल्या सर्व कामगारांचे सर्वेक्षण होऊन ‘त्या’ कामगारांचे बांधकाम कामगार असल्याची सत्यता पडताळणी करावी व त्या नंतरच त्यांना लाभ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे
तसेच कामगारांच्या बांधकाम कामगार आरोग्य सुविधा रुग्णालय व्यवस्था ही अतिशय विस्कळीतपणे सुरु आहे. या योजनेत अंगीकृत असलेल्या अनेक रुग्णालयांचे उपचाराचे पैसे थकलेले आहेत. औषध वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. कामगार रुग्णाला आवश्यक असलेली उपचाराची वाढीव रक्कम मंजुर होत नसल्यामुळे अनेक कामगारांचे रुग्ण हे उच्च दर्जाच्या औषधोपचारापासुन वंचित राहत आहेत. बांधकाम कामगारांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून याबाबतचा लेखाजोखा घेऊन यात दोषी असलेल्या घटकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी.
मयत कामगारांचा विमा व इतर लाभ हे मयत कामगाराच्या मृत्यूनंतर महिन्याच्या आत त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने देण्यात यावा, कामगारांना घरकुल मिळवून देण्याच्या योजनेमध्ये अक्षम्य दिरंगाई होत आहे. या घरकुलाची प्रकरणे तातडीने बैठक घेऊन निकाली काढण्यात यावीत. बांधकाम मजुरांच्या संबंधित असलेल्या मंडळाच्या कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याला असलेल्या नियमावलीला अधिन राहुन काम करण्याचे बंधन करावे.
तसेच तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करुन नवीन कामगारांची ‘त्या’ ठिकाणी भरती करण्याची मागणी समर्पन मजदूर संघाने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे करुन मागण्या मान्य करण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन करणार असल्याची माहीती डॉ. करणसिंह घुले यांनी दिली.





