पंजाब-हरियाणा सीमेवर उद्या शेतकऱ्यांची महापंचायत

चंदिगढ – पंजाब-हरियाणा सीमेवर उद्या (शनिवार) शेतकऱ्यांची महापंचायत होणार आहे. त्यासाठी सीमेवरील खनौरी या ठिकाणी पोहचण्याचे आवाहन शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी देशभरातील शेतकऱ्यांना केले.
केंद्र सरकारने विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी पंजाबमधील शेतकरी आग्रही आहेत. त्यांनी सरलेल्या वर्षातील फेब्रुवारीत दिल्लीच्या दिशेने कूच सुरू केले. मात्र, त्यांना सुरक्षा दलांनी सीमेवर रोखले. तेव्हापासून शेतकरी सीमेवरच ठाण मांडून आहेत. त्या आंदोलनाचा मुख्य चेहरा बनलेले ७० वर्षीय डल्लेवाल यांनी खनौरी येथे बेमुदत उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाला महिनभराचा कालावधी उलटून गेला आहे. त्यांची खालावलेली प्रकृती चिंतेचा विषय बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी महापंचायतीचे आयोजन केले आहे.
महापंचायतीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्वत: डल्लेवाल यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केले. शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळावी, अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. कर्जमाफी आणि इतर मागण्याही त्यांनी पुढे केल्या आहेत.





