‘त्या’ बैठकीला कृषीमंत्री मुंडे गैरहजर; राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण

मुंबई – कांदा प्रश्नावर व्यापाऱ्यांच्या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कांदा व्यापारी (onion traders) आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा एक बैठक दिल्लीत शुक्रवारी झाली. या बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) उपस्थित राहिले नाहीत.
यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कृषीमंत्री नाराज असल्याची चर्चा यानिमित्त सुरू आहे. मात्र, यावर पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते नाराज नसल्याचेही अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
सत्तार यावेळी म्हणाले, हा पणनचा विषय आहे, राज्यात अकोल्यात एक कार्यक्रम असल्यामुळे कृषिमंत्री येऊ शकले नाहीत, नाराजी वैगेरे काही नाही. मुंबईत बैठक झाली तेव्हा मंत्री पियुष गोयल यांचे अधिकारी नव्हते म्हणून शुक्रवारी पुन्हा बैठक झाली. त्यानुसार तिच्यात तोडगा काढण्यात आला. शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकार आणखी दोन लाख टन कांद्याची खरेदी करणार आहे, असेही सत्तार म्हणाले.
या संदर्भात खासदार सुळे यांनी बोलताना, “केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्नी बोलाविलेल्या बैठकीकडे महाराष्ट्रातून जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी हि बैठक अतिशय महत्त्वाची आहे.
या बैठकीसाठी प्रमुख कांदा उत्पादक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राज्यातील प्रमुख मंत्री यांना आमंत्रित केले की नाही याचे उत्तर राज्य सरकारने देणे आवश्यक आहे. जर आमंत्रित करुन देखील ते बैठकीला गेले नसतील, तर या बैठकीकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टीकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील आहे हे स्पष्ट आहे, असे म्हटले होते.





