Agriculture Loss : कांद्यामुळे शेतकऱ्यांच्याच डोळ्यात पाणी ; जुन्यालाही अपेक्षित भाव नाही

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जिल्ह्यासह पुणे विभागात अवकाळी पाऊस सुरू आहे. त्याचा फटका नवीन लाल कांद्याला बसला आहे. एक ते दीड महिने पीक लांबणार आहे. सध्या साठवणीत असलेला जुना कांदा बाजारात दाखल होत आहे. या कांद्यालाही अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे एकीकडे नवीन पिकाचे नुकसान, तर दुसरीकडे जुन्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकूणच सहा महिन्यांपासून कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
घटलेली परदेशातील निर्यात, दक्षिण भारतातून नसलेल्या मागणीमुळे मागील मोठ्या कालावधीपासून कांद्याला भावच मिळत नाही. त्यामुळे भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी जुना कांदा साठवून ठेवला आहे. दरवर्षी ऑक्टोबरअखेरला नवीन कांदा बाजारात येत असतो. मात्र, अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दीड महिना विलंबाने म्हणजे १५ डिसेंबरपासून नवीन कांदा मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे. सध्या तुरळक आवक होत आहे. त्यासही नाममात्र दर मिळत आहे.
जुना कांद्याची आवक मागील वर्षी सप्टेंबरअखेरलाच संपली होती. मात्र, यंदा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी माल साठवून ठेवला आहे. त्याची आवक सध्या मोठी होत आहे. शुक्रवारी (दि. ३१) बाजारात ११० ट्रक जुन्या कांद्याची आवक झाली. नवीन कांदा बाजारात कमी प्रमाणात असल्याने या कांद्याच्या भावात आठवड्यात घाऊक बाजारात किलोमागे २ ते ३ रुपयांनी वाढ झाली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार १२ ते १८ रुपये भाव आहे.
यातून उत्पादन खर्चही निघत नाही. त्यातच जुना साठवणूकीतील माल बराच खराब झाला आहे. त्यामुळे तेथेही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. येथील बाजारात जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील श्रींगोदा व पारनेर भागातून आवक होत आहे. नवीन कांद्याची पुरंदर, सातारा जिल्ह्यातील फलटण भागातून आवक होत असते.
“एप्रिलपासून कांद्याला कमी भाव आहे. नवीन पिकाचे नुकसान झाले आहे. जुन्यालाही भाव मिळत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. वितरण व्यवस्था, निर्यात धोरण व्यवस्थित नसल्यामुळे हे घडत आहे. यावर सरकारने उपाययोजना केली पाहिजे.”
– राम नरवडे, कांद्याचे व्यापारी, मार्केट यार्ड





