Pimpri : रब्बी पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाची मोहीम

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारी व हरभरा या पिकांचे कीड व रोगराई पासून संरक्षण करण्यासाठी कृषी खात्याच्या मार्गदर्शनाखाली फेरोमन ट्रॅप लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती सुरू झाली आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून मावळ तालुक्यात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. मावळ तालुक्याच्या विशेषताः पूर्वपट्ट्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची सर्वाधिक पेरणी केली आहे. त्यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचा समावेश आहे. या पिकांची उगवण देखील अतिशय चांगली झाली असून पिकांचे कीड व रोगराई पासून संरक्षण व्हावे यासाठी कृषी विभाग मावळ यांकडून खास मोहीम राबविण्यात येत आहे.
मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना कीड व रोगराई बाबत सविस्तर माहिती देऊन व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. सध्या आढले बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कृषी सहाय्यक अक्षय ढुमणे ज्वारी व हरभरा या पिकांच्या संरक्षणासाठी फेरोमन ट्रॅप लावण्याबाबत सविस्तर माहिती प्रत्येक शेतकऱ्याला देत आहेत.
मावळातील पूर्व भागात अनेक गावांत रब्बी पिकांची उगवण अतिशय चांगली झाली आहे. पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी, मार्गदर्शन व जनजागृती मोहीम सुरू केली आहे. यंदा परतीच्या वळवाच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या ऑक्टोबर महिन्यातच पूर्ण झाल्या. तसेच सध्या थंडीची तीव्रता वाढली असून हे वातावरण रब्बी पिकांसाठी पोषक ठरत आहे.
मावळ तालुक्यातील रब्बी क्षेत्र
गहू – ३५० हेक्टर
ज्वारी – ७५ हेक्टर
हरभरा – ३७५ हेक्टर
बागायती कांदा क्षेत्र – ५०० हेक्टर





