Pune District : पेसा भागात कृषी पदभरती जलदगतीने : दत्तात्रय भरणे
Pune District : तसेच शासनाच्या निर्णयानुसार मानधन तत्वावर कार्यरत कृषी सेवकांच्या नियमितीकरणासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इंदापूर : राज्यातील पेसा क्षेत्रातील कृषी विभागातील रिक्त पदभरती प्रक्रिया गतीने पूर्ण करून कृषी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत त्यांनी संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश देत पदभरतीची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
राज्यातील १३ पेसायुक्त जिल्ह्यांमधील कृषी साहाय्यक व कृषी सेवक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी बिंदूनामावलीची प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले. तसेच शासनाच्या निर्णयानुसार मानधन तत्वावर कार्यरत कृषी सेवकांच्या नियमितीकरणासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पेसा क्षेत्रातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांपर्यंत कृषी योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण करण्यासाठी शासन गंभीर आहे, असे भरणे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करत पदभरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले. या बैठकीस आमदार राजू नारायण तोडसाम, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्यासह सर्व विभागीय कृषी संचालक ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.
हेही वाचा : Pune District : ‘जलजीवन’ची पाइप पळविण्याचा प्रयत्न; दौंडज येथील ग्रामस्थांची सतर्कता





