पुणे जिल्हा | बारामतीत शेतमाल तारण कर्ज योजना

बारामती, (प्रतिनिधी) – शेतक-यांचा शेतमाल काढणी हंगाम सुरू झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी येत असल्याने शेतमालाचे बाजारभाव खाली येऊ शकतात. त्यामुळे शेतक-यांचे आर्थिक नुकसान होते.
हा शेतमाल साठवणूक करून काही कालावाधी नंतर विक्री केल्यास त्या शेतमालाची वाढलेल्या भावाने विक्री होऊन शेतक-यांना जादा दर मिळु शकतो.
ही बाब विचारात घेऊन शेतक-यांना रास्त बाजारभाव मिळावा या दृष्टीकोनातुन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने पणन मंडळाने केलेल्या सुचना विचारात घेऊन गतवर्षी प्रमाणे 2024-2025 या हंगामा करिता शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे.
या शेतमाल तारण कर्ज योजनेचा शेतक-यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी केले आहे.
शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत बाजरी, गहु, ज्वारी, उडीद, सोयाबीन आदी शेतीमाल स्विकारला जाईल. यासाठी बाजार समितीच्या अटी व शर्ती लागु राहतील. या योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यास ठेवलेल्या शेतीमालावर हमीभावा प्रमाणे किंवा चालु बाजारभावानुसार किंमतीचे 50 ते 75 टक्के कर्ज दिले जाईल.
या तारण कर्ज बाजार समिती मार्फत द.सा.द.शे. 3 टक्के व्याजाने धनादेशाद्वारे सहा महिने मुदती करिता दिले जाईल. शेतमाल तारण ठेवण्यापूर्वी शेतक-यांनी आपला माल यांत्रिक चाळणीवर स्वच्छ केलेला असावा. तसेच हा शेतमाल वाळलेला व गोणपाटाच्या बारदान्यात स्विकारला जाईल.
ओलावा असलेला शेतमाल स्विकारला जाणार नाही. या योजनेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी बारामती बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
ही कागदपत्रे लागणार
शेतक-यांनी 7/12 उतारा त्यावर चालु हंगामातील पीक नोंद, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, मोबाइल नंबर





