Agnimitra Paul : “..पण ममता बॅनर्जींनी स्वतः हे धाडस दाखवावे, अन् पंतप्रधानांच्या विरोधात..” ; भाजपकडून थेट आव्हान

Agnimitra Paul : देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे सुरु झाले आहे. त्यातच प्रत्येक पक्ष आपल्या परीने प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यातच पश्चिम बंगालमधून एक बातमी समोर येत आहे.राज्यातील भाजपा नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना मोठे आव्हान दिले आहे. पॉल यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवण्याचे चॅलेंज दिले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना वाराणसी येथून निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला होता, अशी माहिती समोर आली होती. ही माहिती समोर आल्यानंतर भाजप नेत्या अग्निमित्रा यांनी बॅनर्जी यांना हे आव्हान दिले. याविषयी बोलताना पॉल यांनी,“जागावाटपाची चर्चा होण्याआधी ममता बॅनर्जी यांनी प्रियांका गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी येथून निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला. पण ममता बॅनर्जी यांनी स्वतः हे धाडस दाखवावे. तुम्हाला पंतप्रधान व्हायचे आहे. मग तुम्हीच पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवावी. यातून तुमच्यात किती हिंमत आहे, हेही दिसून येईल”, असे आव्हान अग्निमित्रा यांनी दिले आहे.
अग्निमित्र पॉल यांनी यावेळी इंडिया आघाडीमधील नेत्यांमधील राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विसंगती लक्षात आणून दिली. त्या म्हणाल्या, पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते अंधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसवर कार्यकर्त्यांच्या हत्या केल्याचा आरोप केला होता. राज्याच्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या होत्या. दरम्यान ममता बॅनर्जी सोनिया गांधी यांच्यासमवेत दिल्लीत एकाच मंचावर येतात आणि आपापसात चांगली मैत्री असल्याचे दाखवून देतात. तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी करून लोकसभेच्या निवडणुका लढविताना अधीर रंजन चौधरी पीडिता कुटुंबियांना काय तोंड दाखविणार आहेत? असा प्रश्न अग्निमित्रा यांनी उपस्थित केला.
२०१९ साली झालेल्या निवडणुकीतही प्रियांका गांधी वाराणसी येथून पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसचे नेते अजय राय यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आलीहोती.





