शत्रूंचा उडणार थरकाप ! रेल्वेवरून क्षेपणास्त्र डागले ; अग्नि प्राईमची यशस्वी चाचणी

Agni-Prime Missile। भारताला ऐतिहासिक यश मिळाले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) मध्यम-श्रेणीच्या अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र रेल्वेमधून प्रक्षेपित करण्यात आले. अग्नि-प्राइम रेल्वे-आधारित मोबाइल लाँचरवरून प्रक्षेपित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज एका पोस्टद्वारे, अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची माहिती शेअर केली. यापोस्टमध्ये त्यांनी, “भारताने रेल्वे-आधारित मोबाइल लाँचर सिस्टमवरून मध्यम-श्रेणीच्या अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. हे पुढील पिढीचे क्षेपणास्त्र अंदाजे २००० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्यास सक्षम आहे आणि त्यात अनेक प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. विशेषतः डिझाइन केलेल्या रेल्वे-आधारित मोबाइल लाँचरवरून अशी चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.” असे म्हटले आहे.
राजनाथ सिंह यांच्याकडून डीआरडीओचे अभिनंदन Agni-Prime Missile।
संरक्षणमंत्र्यांनी डीआरडीओचे यशस्वी चाचणीसाठी अभिनंदन केले. त्यांनी दुसऱ्या एका पोस्टद्वारे, “अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) आणि सशस्त्र दलांचे हार्दिक अभिनंदन. या यशस्वी चाचणीमुळे भारताला रेल्वे प्रणालीवरून क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम असलेल्या काही निवडक देशांमध्ये स्थान मिळाले आहे.” असे म्हटले आहे.
अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची खास वैशिष्ट्ये Agni-Prime Missile।
हे क्षेपणास्त्र २००० किलोमीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यात रेल्वे नेटवर्कवरून प्रवास करण्याची क्षमता आहे. ते अगदी कमी वेळात देशातील कोणत्याही सीमेवर सहजपणे वाहून नेले जाऊ शकते. ते रडार टाळण्यास अत्यंत सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र इतर अनेक प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. त्याची नेव्हिगेशन प्रणाली खूप चांगली आहे, ज्यामुळे ते शत्रूच्या लक्ष्यांना अचूकपणे लक्ष्य करू शकते.





