वडगाव मावळ, {किशाेर ढोरे} – लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर महायुतीत आरोप-प्रत्यारोप झाले. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार असून त्यासाठी मावळ तालुक्यात पुन्हा बूथनिहाय आकडेमोड सुरू आहे. यशाचे अनेक मानकरी असतात. मात्र जर अपयश आले तर मग त्याचे खापर कोणाच्या माथी फुटणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या आकडेवारीवरच विधानसभेचे गणित अवलंबून राहणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच विद्यमान आमदारांसाठी ही परीक्षा ठरणार आहे. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर बूथनिहाय किती मतदान पडले याची चाचणी आमदारांकडून सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये पनवेल, कर्जत, उरण हे मतदार संघ घाटाखालचे आहेत. तर घाटावरील मावळ, चिंचवड आणि पिंपरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघात या सहाही मतदार संघात महायुती आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा समावेश असल्याने या मतदार संघावर कागदोपत्री तरी महायुतीचेच प्राबल्य दिसून येते. सर्वाधिक मतदार संख्या चिंचवडमध्ये असून येथे सहा लाख १८ हजार २४५ मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार संख्या कर्जत मध्ये असून येथे तीन लाख, नऊ हजार २०८ मतदार आहेत. सहापैकी चिंचवड आणि पनवेल या दोन मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. तर पिंपरी आणि मावळ विधानसभा क्षेत्रात अजित पवार यांच्या राष्र्टवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार आहेत. कर्जतमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि उरणमध्ये अपक्ष आमदार असून त्यांनी यापूर्वीच महायुतीला पाठींबा दिला आहे. चार महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीची ताकद कमी झाली हे बूथनिहाय मतदानातून स्पष्ट होईल. लोकसभेच्या पनवेलमधून ५०.५०, कर्जत ६१.४०, उरण ६७.०५, मावळ ५५.४२, चिंचवड ५२.२० आणि पिंपरीतून ५०.२० टक्के मतदान झाले. सहाही आमदारांसाठी मावळ लोकसभा मतदार संघात विधानसभा मतदारसंघनिहाय पडलेले मतदान महत्त्वाचे ठरणार आहे किंबहुना राजकीय भवितव्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मावळमध्ये राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी काम केले नसल्याचा आरोप केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यामुळे येत्या ४ जून रोजी कोणी काम केले आणि कोणी केले नाही, हे गुपित उघडणार आहे. भविष्याची ठरणार दिशा लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदारांमध्ये बूथनिहाय मतदानाची आकडेवारी पुन्हा संकलित करण्याचे काम सुरू आहे. कुठल्या मतदारसंघांमध्ये किती मतदान पडले, झालेले मतदान आपल्यासाठी फायदेशीर आहे की तोट्याचे याची आकडेमोड सुरू झाली आहे. मुस्लिम व दलितबहुल मतदारसंघामध्ये अशा प्रकारची आकडेवारी संकलित केली जात असून, भविष्यात येथे धर्मकारणावर निवडणूक वाढण्याची शक्यता आहे.